Pune : जेएनयू मधील हल्ल्याचा गरवारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून निषेध (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात रविवारी(दि. 5) संध्याकाळी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद पुण्यात उमटले. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर उतरत निदर्शने केली तर गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या घटनेचा आज, सोमवारी सकाळी निषेध करीत आंदोलन केले.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील होत असलेल्या हल्ल्यावरुन विद्यार्थी संतप्त झाले असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात रविवारी संध्याकाळी जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. चेहरे झाकलेले अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. शिक्षकांवरही हल्ला करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. मात्र, दोन्ही संघटनांनी एकमेकांवर दोषारोप केले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे हे पाहताच पोलिसांना पाचारण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.