Pimpri: ‘संरक्षण विभागाच्या हद्दीतील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करा’

भाजप पदाधिका-यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनेक भागात सरंक्षण विभागाच्या मिळकती आहेत. महापालिकेच्या मंजूर विकास योजनेत सरंक्षण विभागाच्या हद्दीतून रस्ते दाखविण्यात आले आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करता हे रस्ते विकसित करणे आवश्यक आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा सरंक्षण विभागाने महापालिकेकडे हस्तातंरीत करावी, अशी मागणी भाजप पदाधिका-यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. याबाबत महिन्याभरात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन गडकरी यांनी दिले असल्याचे, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी दोन दिवसांपूर्वी पुणे दौ-यावर होते. पिंपरी महापालिकेतील पदाधिका-यांनी पुणे विमानतळावर गडकरी यांची भेट घेऊन महापालिकेस आवश्यक असणा-या सरंक्षण विभागाकडील आवश्यक असणा-या जागांबाबत निवेदन देण्यात आले. जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी संरक्षण विभागाची बैठक आयोजित करण्याकरिता सहकार्य करण्याची विनंती केली. महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माधवी राजापुरे, माजी नगरसेवक राजु दुर्गे होते.

महापालिकेच्या हद्दीतील पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, सांगवी, पिंपळेगुरव, दिघी, बोपखेल या गावाच्या आजू-बाजूला सरंक्षण विभागाच्या मिळकती आहेत. महापालिकेच्या मंजूर विकास योजनेत सरंक्षण विभागाच्या हद्दीतून रस्ते दाखविण्यात आलेले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करता सदरचे रस्ते विकसित करणे आवश्यक आहे. सदरच्या रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा सरंक्षण विभागाने महापालिकेकडे हस्तातंरीत करण्याची मागणी महापालिकेने केली आहे.

त्यामध्ये कासारवाडी लांडेवाडी भोसरी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्गातील सीएमई कॉलेज हद्दीतील जागा, पिंपळेसौदागर सर्व्हे नं. 28 व 29 (एचसीएमटीआर) मधील जाणारा उच्चक्षमता द्रुतगती मार्ग, पिंपळेसौदागर येथील सर्व्हे नं.79 ते 119,120 व 121 पैकी जागेतून जाणारा 18 मी रुंद रस्ता, पिंपळेनिलख येथील सर्व्हे नं. 9,12 व 13 मधील 12 मीटर रुंद रस्ता, सांगवी फाटा ते सांगवीगाव 12 मीटर रस्ता, बोपखेल येथील आळंदी रोड ते गणेशनगर सर्व्हे नं. 31, 34, 35, 28,49, 51 व 127, सांगवीतील 12 मीटर रस्ता, पिंपरी येथील मिलिट्री डेअरी फार्म जवळ रेल्वे उड्डाणपुलासाठीची जागा, पिंपळेगुरव ते मौजे सांगवीपर्यंत संरक्षण विभागाच्या हद्दीतील 12 मीटर रुंद रस्त्यालगत आणखी 18 मीटर रुंद रस्ता आणि भोसरी कासारवाडी येथील सर्व्हे नं. 518, 519, 520 या मिळकतीमधून जाणारे रस्त्यांची जागा महापालिकेला आवश्यक आहे.

सरंक्षण विभागाच्या मागणीनुसार रस्त्यांसाठी आवश्यक असणा-या जागेची रक्कम महापालिकेला सरंक्षण विभागास अदा करावी लागेल. सरंक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारे रस्ते विकसित करण्यासाठी जे जे बांधकाम पाडले जाईल. ते बांधकाम महापालिकेने बांधून द्यावे लागेल. याबाबत सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत महिन्याअखेरी बैठक आयोजित करण्यात येईल. सरंक्षण विभागाशी समन्वय साधून हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वास गडकरी यांनी दिल्याचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.