Hinjawadi : हिंजवडी, दिघीमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरी थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे वाहनचोरी करीत आहेत. त्यामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी मधून दोन तर दिघी परिसरातून एक दुचाकी चोरून नेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंकुश महादेव कनपुरे (वय 34, रा. शिंदेवस्ती, मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कनपुरे यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी सी 7420 ही दुचाकी 5 जानेवारी रोजी रात्री घरासमोर लॉक करून पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. 6 जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात आणखी एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेमचंद मनुराम देवपाल (वय 35, रा. थेरगाव) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवपाल यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम एच 14 / सी ई 3195 ही दुचाकी 4 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता भुजबळ वस्ती वाकड येथील ब्रिज खाली लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. 5 जानेवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

आकाश लोमेश चंद्र डेकाटे (वय 25, रा. भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश यांनी त्यांची 14 हजार रुपये किमतीची एम एच 28 / ए ए 0107 ही दुचाकी 6 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आळंदी घाटावर वैतागेश्वर मंदिराच्या मागील बाजूला लॉक करून पार्क केली. त्यानंतर ते अर्ध्या तासात त्यांचे काम संपवून दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता दुचाकी गायब असल्याचे दिसले. अज्ञात चोरट्याने अर्ध्या तासात त्यांची दुचाकी चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.