Pune : गायी-म्हशीचे दूध 2 रुपयांनी महागले !

एमपीसी न्यूज- खासगी दूध संघांनी पावडरच्या दरात वाढवलेल्या दरामुळे व दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे पाउचमध्ये मिळणारे दूध संघ अडचणीत आले आहेत. त्यामुळे कल्याणकारी दूध संघाने आता गायी-म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटरमागे 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गायीच्या दुधासाठी 46 वरून 48 रुपये तर म्हशीच्या दुधासाठी 56 ऐवजी 58 रुपये प्रति लिटर मोजावे लागतील. उद्या रविवारपासून नवे दर लागू होतील.

दूधाच्या विक्री दराबाबत शुक्रवारी राज्यातील दूध कल्याणकारी संघाची बैठक पुण्यात झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर तसेच संघाचे 52 सदस्य दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘पावडर, बटरच्या खरेदी दरात राज्यातील खासगी दूध संघांनी 32 ते 33 रुपये दर देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही पाऊच विक्री करणारे दूध संघ खरेदी दर 31 रुपये दर देत आहोत. सध्या हिवाळ्यात दुधाच्या उत्पादनात दर वर्षी 20 ते 22 टक्के वाढ होते. उशिरापर्यंतच्या पावसामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला. 10 टक्के दूध उत्पादन घटले आहे. यामुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. परिणामी, दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करण्याबाबत संघाच्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायी, म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर प्रत्येकी 2 रुपयांनी दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती गोपाळराव म्हस्के यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.