Chakan Crime News : ऑनलाईन जाहिरातीद्वारे माल विकण्याच्या बहाण्याने 13 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर जाहिरात देऊन त्याआधारे ग्राहकाने संपर्क केल्यास त्यांच्याकडून पैसे घेऊन माल न पाठवता फसवणूक केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील शिंदेगाव येथे उघडकीस आला आहे. 26 एप्रिल रोजी दुपारी हा प्रकार घडला आहे.

गणेश माणिक टेमगिरे (वय 26, रा. शिंदेगाव, पो. वासुली, ता. खेड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 29) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रिन्स चौहाण (रा. दिल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फेसबुक या सोशल मीडियावर त्यांचे अकाउंट चेक करत होते. त्यावेळी त्यांना ऑल फिक्सल एल ई डी पॅरालाईट अशी एक जाहिरात पाहण्यास मिळाली. त्या जाहिरातदाराशी फिर्यादी यांनी संपर्क केला असता आरोपीने फिर्यादी यांना व्हाट्सअपवर काही एलईडी लाईटचे काही व्हिडीओ पाठवले. फिर्यादी यांना ते पसंत पडल्याने त्यांनी 60 फूट लांबीच्या एलईडी फिक्सलच्या 20 पट्ट्यांची ऑर्डर दिली. त्याचे पैसे 12 हजार आणि ट्रान्सपोर्ट खर्च 1500 रुपये असे एकूण आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 13 हजार 500 रुपये घेतले. मात्र माल न पाठवता फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.