Pimpri: भाजपच्या शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. माधवी नाईक यांनी आज (गुरुवारी) जाहीर केले.  महेश लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष होणार असल्याबाबतचे वृत्त एमपीसी न्यूजने 4 जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे एमपीसी न्यूजच्या वृत्ताला आजच्या निवडीमुळे दुजोरा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपची बैठक आकुर्डी येथे आज (गुरुवारी) होत आहे. या बैठकीत आमदार लांडगे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा ढोरे, माजी मंत्री विनोद तावडे, खासदार अमर साबळे, मावळते शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, उमा खापरे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, रवी लांडगे, शैला मोळक, महेश कुलकर्णी आजी- माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

लक्ष्मण जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली.

आमदार महेश लांडगे भोसरी मतदारसंघातून सलग दुसऱ्यावेळी निवडून आले आहेत. 2014 मध्ये ते अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लांडगे भाजपच्या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. आता त्यांची भाजपाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे.

Pimpri: भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.