Bhosari : कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या खर्चात वाढ

एमपीसी न्यूज – भोसरीतील गावजत्रा मैदानालगत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, वर्षभरापूर्वीच या केंद्रातील उर्वरीत कामांसाठी पावणेनऊ कोटी रूपये खर्चास मंजुरी दिली असताना आता पुन्हा उर्वरीत कामांसह टप्पा दोन मधील विद्युतविषयक कामे करण्यासाठी आणखी पावणेचार कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.

भोसरी येथे सर्व्हे क्रमांक एकमध्ये गावजत्रा मैदानालगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या कुस्ती केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या केंद्राला ‘मारूतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र’ असे नाव देण्यात येणार आहे. 8 हजार 600 चौरस मीटर जागेत 5 हजार 760 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये हे केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्राच्या पहिल्या मजल्यावर मॅटवरील कुस्ती सामने भरविण्यासाठी इनडोअर स्टेडीयम, ज्यामध्ये एकावेळेस बारा बाय बारा मीटर मॅटवरीच्या दोन कुस्ती स्पर्धा भरविता येतील.

सामना पाहण्यासाठी एकाच वेळी 1250 कुस्तीशौकिन बसू शकतील. त्यांच्यासाठी मध्यंतरामध्ये खाद्यपदार्थ विक्रीची व्यवस्था बाहेरच्या बाजूला असणार आहे. या व्यतिरिक्त कुस्तीगिर व प्रशिक्षकांना बसण्यासाठी सहा स्वतंत्र कक्ष, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन समयी बाहेर पडण्यासाठी तीन बाजुंनी जिने, मुबलक हवा आणि उजेडासाठी छतावर पॉलिकार्बोनेट, स्कायलायट, टर्बो वेटींलेटर, कुलर, इमारती समोर आणि दोन्ही बाजुला पार्किंग व्यवस्था आदी सुविधाही असणार आहेत.

या केंद्रात अप्पर आणि लोअर असे दोन तळमजले असणार असून अप्पर तळमजल्यावर स्वागतकक्ष व प्रशासन, आहारतज्ज्ञ व आरोग्य तज्ज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहेत. महिला व पुरूषांसाठी अत्याधुनिक सामुग्रीसह दोन जिम, स्वतंत्र लॉकर्स, प्रसाधन गृह व चेंजिंग रुम, प्रशिक्षणासाठी येणा-यांसाठी दोन हॉल, प्रत्येक हॉलमध्ये पंचवीस विद्यार्थ्यांची राहण्याची सोय, त्याला लागुनच प्रसाधनगृह असणार आहेत. लोअर तळमजल्यावर अत्याधुनिक मॅटवरील कुस्ती प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय व स्पोर्ट अ‍ॅथोरीटी ऑफ इंडियाच्या मानकाप्रमाणे आवश्यक प्रशस्त हॉल बांधण्यात येणार आहे. त्याला लागुनच तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षकांसाठी कक्ष, प्रसाधनगृह, लॉकर रुम असणार आहे. प्रशिक्षणासाठी आलेल्या स्वच्छ भोजनकक्ष असणार असून ज्यामध्ये एकाच वेळी 84 जणांची व्यवस्था होणार आहे. त्याशेजारी स्वयंपाकगृह, धान्य व इतर साहित्यासाठी स्टोअर रुम, व्यवस्थापक कक्ष राहणार आहे.

कुस्ती केंद्रातील उर्वरीत अनुषंगिक कामे करण्यासाठी वर्षभरापूर्वी पावणेनऊ कोटी रूपये खर्चास मंजुरी देण्यात आली होती. आता पुन्हा उर्वरीत अनुषंगिक कामे तसेच टप्पा दोन मधील विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या कामासाठी 4 कोटी 3 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी रिअल इलेक्ट्रीकल्स या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा सहा टक्के कमी म्हणजेच 3 कोटी 79 लाख रूपये दराची निविदा सादर केली. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी 1 जानेवारी 2020 रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.15) मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.