Pimpri: प्रथम सत्र परीक्षेसाठी सात लाखांच्या उत्तरपत्रिका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाकडील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी आवश्यक उत्तरपत्रिका छपाई करून घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे 6 लाख 89 हजार रुपये इतका खर्च आला आहे.

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा 10 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. या परीक्षेसाठी आवश्यक उत्तरपत्रिका पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागातर्फे तातडीने छपाई करून त्या शाळानिहाय वाटप करण्याबाबत कळविले होते. या कामासाठी महापालिका मध्यवर्ती भांडार विभागातर्फे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यानुसार प्राप्त झालेल्या निविदांपैकी सर्वाधिक कमी दराची निविदा रहाटणी येथील मेसर्स विशाल एंटरप्राईजेस यांनी सादर केली होती. दरम्यान, प्रथम सत्र परीक्षेच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. ती विचारात घेता शासन निर्णयातील तरतूदीनूसार निविदा मंजूर दरानुसार प्रथम सत्र परीक्षेसाठी आवश्यक उत्तरपत्रिका छपाई करून पुरवठा करण्याबाबत सप्टेंबर 2019 मध्येच करारनामा करून घेण्यात आला आहे. त्यानुसार या उत्तरपत्रिका छपाईसाठी 6 लाख 89 हजार 880 रुपये इतका खर्च आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.