Pune : सीएए, एनआरसी विरोधी आंदोलकांच्या विरोधात खासदार गिरीश बापट यांच्या मुलाची तक्रार

एमपीसी न्यूज- सीएए, एनआरसीच्या विरोधात शनिवारी (दि. 18) संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत संभाजी उद्यानासमोर जागे राहून काही संघटनांनी निदर्शने केली. यावेळी भारत विरोधी घोषणा आणि हुल्लडबाजी केल्याप्रकरणी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट यांनी पोलिसांकडे केली आहे.

सीएए, एनआरसीच्या विरोधात शनिवारी (दि. 18) संध्याकाळपासून रविवारी पहाटेपर्यंत संभाजी उद्यानासमोर जागे राहून काही सामाजिक संघटनांनी निदर्शने केली. या दरम्यान पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या तसेच हुल्लडबाजी करण्यात आल्याचा आरोप गौरव बापट यांनी केला आहे. कोणत्याही परवानगी शिवाय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध हा सर्व प्रकार सुरु होता. त्याचप्रमाणे पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व प्रकार सुरु असल्याचे गौरव बापट यांनी म्हटले आहे.

कायद्याचा भंग करणाऱ्या सर्वांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन गौरव बापट यांनी डेक्कन जिमखाना पोलिसांना दिले आहे. दरम्यान, निदर्शकांना पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. गौरव बापट यांचा अर्ज दाखल झालेला असला तरीही अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.