Pimpri : रावेत, निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार

50 कोटीच्या खर्चाला महासभेची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत पंपगृहातील पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत देखील वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 50 कोटी रुपये खर्चाच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला आज (सोमवारी) झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पवना नदीतून रावेत बंधारा येथील पालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून दररोज 490 ते 495 एमएलडी पाणी उचलले जाते. केंद्राची तसेच, वीजेची क्षमता कमी असल्याने पवना नदीतून अधिकचे पाणी उचलले जात नसल्याने शहरातील काही भागात पाणीटंचाईचा समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

पवना धरणात एकूण 185.67 दशलक्ष घनमीटर पाणी उपसा आरक्षण मंजूर आहे. सद्या पवना नदीतून पाणी उचलण्यात येते. पाणी वाहून नेण्याची क्षमता लक्षात घेता प्रतिदिनी 480 एमएलडी पाणी उपलब्ध होते. सद्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्धीकरण करण्याची स्थापित क्षमता 428 एमएलडी इतकी आहे. त्यातही ओव्हर लोडींग करून 480 एमएलडी इतके पाणी उचलले जाते.

सन 2019 मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, मर्यादित क्षमतेमुळे महापालिकेला पाणी उचलता आले नाही. त्यामुळे एकूणच पाणी उचलणे आणि शुद्धीकरण क्षमतेमध्ये वाढ केल्यास, ज्यावर्षी जादा पाऊस होईल, त्यावर्षी जास्त पाणी उचलणे शक्य होणार आहे. त्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथून प्रतिदिन 100 दशलक्ष लिटर अतिरिक्त जलउपसा करण्यात येणार आहे.

त्यासाठी रावेत येथील पंपिंग मशिनरी व जलशुद्धीकरण केंद्र यांची क्षमता वाढविण्याची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. या कामाचा समावेश महापालिकेच्या सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात नसल्यामुळे अंदाजपत्रकातील ’विशेष योजना’ या लेखाशिर्षाखाली ’रावेत येथील पंपिंग मशिनरी व सेक्टर क्रमांक 23 मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणे’ या कामाचा नव्याने समावेश करण्यात आला. त्यानंतर या कामासाठी आवश्यक 50 कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.