_MPC_DIR_MPU_III

Lonavala : माणूस आणि यंत्राने एकत्रित काम करण्याचे शिक्षण देणं ही आजची गरज – डॉ. रघुनाथ माशेलकर

एमपीसी न्यूज- तंत्रज्ञानाचा होणारा विस्तार आपण नाकारू शकत नाही, त्यामुळे यंत्र आणि माणूस यांनी एकत्रितपणे काम कसं करावं, याचं शिक्षण देणं ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. एज्युकेशन इज इक्वल टु फ्युचर म्हणजे शिक्षण हेच भविष्य हा सगळ्यात महत्वाचा सिध्दांत आहे, असे मांडतानाच सध्या देश दुभंगतोय, अशा परिस्थितीत शिक्षणानेच माणूस एकत्र येऊन भविष्य घडवू शकतो, असं प्रतिपादन जगप्रसिध्द शास्त्रज्ञ, तत्वज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

_MPC_DIR_MPU_IV

माणूस घडवणारे शिक्षण या विषयावर मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शिक्षण परिषद 2020 या कार्यक्रमाची सांगता डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या बुध्दीनिष्ठ आणि भविष्यवेधी कृतीविचारांच्या मांडणीने झाली. लोणावळा येथील मनशांती आश्रमात, रविवारी 19 जानेवारी रोजी मनशक्ती शिक्षण परिषद 2020 चा समारोप सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून माशेलकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनशक्ती शिक्षण परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय कुवळेकर, मनशक्ती प्रयोगकेंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त तसेच संशोधनप्रमुख गजानन केळकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मनशक्तीने आयोजित केलेली शिक्षण परिषद ही देशाचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने कार्यरत झालेली असल्याने ‘भारत भविष्य परिषद’ असे त्याला यापुढे संबोधण्यात यावे, अशी सूचना करत माशेलकर यांनी या उपक्रमाचे सद्यस्थितीतील महत्व काय आहे यावर सविस्तर भाष्य केले. वैज्ञानिकांच्या एका बैठकीत आजच्या काळातील महत्वाचा शास्त्रीय सिध्दांत कोणता ?, यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी आईनस्टाईन, न्यूटन यांच्या सिध्दांतापेक्षाही ‘इ (एज्युकेशन) इज इक्वल टु एफ (फ्युचर)’ हा आजचा महत्वाचा शास्त्रीय सिध्दांत असल्याचा विचार आपण मांडला आणि तो सगळ्यांना पटला, असे माशेलकर यांनी सांगितले. अर्थात शिक्षणाचा त्यांनी मांडलेला हा सिध्दांत खरा कसा आहे हेही त्यांनी आपला अनुभव सांगून सिध्द केले. हा सिध्दांत 30 मार्च 2000 रोजी सिध्द झाला.

_MPC_DIR_MPU_II

माझी परिस्थिती गरीब असल्याने टाटांची 60 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आणि मी महाविद्यालयात शिकू शकलो. माझ्यात आणि तत्कालिन राष्ट्रपती के. आर. नारायणन् यांच्या परिस्थिती आणि संघर्षात साम्य आहे. तेही याच शिष्यवृत्तीवर महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकले. 30 मार्चला मला पद्मभूषण पुरस्कार मिळाला तो के. आर. नारायणन यांच्या हस्ते… आणि त्याचवेळी माझ्यापाठोपाठ हा पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला होता. ज्या टाटांकडून शिष्यवृत्ती घेतली तो मी पुरस्कार स्वीकारत होतो, ज्या टाटांनी दिली तेही पुरस्कार स्वीकारत होते आणि ज्यांनी माझ्यासारखीच ती शिष्यवृत्ती घेतली ते के. आर. नारायणन हा पुरस्कार देत होते. अशापध्दतीने कुठलाही भेदाभेद न मानता घडणारा चमत्कार केवळ शिक्षणानेच साध्य होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

तुमच्या उच्च महत्वाकांक्षा तुम्हाला त्याच्या पूर्ततेकडे घेऊन जातात. मात्र महत्वाकांक्षा बाळगताना तुम्ही काहीही करू शकता पण सगळंच करू शकत नाही, हेही लक्षात घ्या. नाहीतर मुलांची शक्ती नको त्या ठिकाणी खर्ची होते, असा सल्लाही त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिला. शिक्षणाने माणसं सगळे भेद विसरून एकत्र काम करतात आणि त्यातून देशासाठी नवनिर्मिती साध्य होऊ शकते, हे सांगतानाच सध्या देश दुभंगतो आहे आणि अशा परिस्थितीत एकत्रित काम करून देशासाठी नवनिर्मिती करणे हे आपले ध्येय असले पाहिजे, असेही डॉ. माशेलकर यांनी यावेळी सांगितले.

केरळमध्ये मॅनहोल साफ करण्यासाठी तरूणांनी रोबोटची निर्मिती केली आहे. हे रोबोट ऑपरेट करण्याचे प्रशिक्षण सफाई कामगारांना देत त्यांनी त्यांच्या कामाला प्रतिष्ठाही मिळवून दिली आणि सामाजिक न्यायाचा हेतूही साध्य केला. हे त्यांना साध्य झालं कारण त्यांनी मूल्यसंवर्धनावर विश्वास ठेवला, हे उदाहरण देत यापुढे अशीच नीतिमूल्ये जपणारी, यंत्र आणि माणसाला एकत्र आणत काम करणारी पिढीच भविष्य घडवणार आहे, असेही सूतोवाच त्यांनी यावेळी केली.

जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी सुरूवातीला डॉ. माशेलकर यांचा परिचय करून दिला. तर डॉ. वर्षा पटारे तोडमल यांनी या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तीन दिवस चाललेल्या या शिक्षण परिषदेत तब्बल 21 विचारवंत आणि मान्यवर वक्त्यांनी माणूस घडवणारे शिक्षण कसे असावे, याबद्दल वेगवेगळ्या अंगाने मार्गदर्शन केले. यात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे विवेक सावंत, सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पंडित विद्यासागर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. दीपक घैसास, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, प्रवरानगरचे अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत थोरात, डॉ. चंद्रशेखर देसाई, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. विदुला म्हैसकर, ज्ञानप्रबोधिनीचे डॉ. गिरीश बापट, फिनलंडहून आलेले शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, प्रसिध्द लेखक-कवी प्रवीण दवणे आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या परिषदेत सहभाग घेतला. विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने परिषदेचा समारोप झाला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.