Talegaon Dabhade : पोटनिवडणुकीत नगरसेवकपदी निखिल भगत बिनविरोध

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 ब मधील पोटनिवडणुकीसाठी जनसेवा विकास समितीचे उमेदवार निखील उल्हास भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (दि.23) भगत यांचा एकमेव अर्ज निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ, मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी भगत यांची बिनविरोध निवड घोषित केली.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी नवनिर्वाचित नगरसेवक निखील भगत यांना नगरसेवकपदी निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे, सुनील पवार, कल्पेश भगत, आदी उपस्थित होते.

नगरसेवक संदीप शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. पूर्वी भाजपमध्ये असलेल्या निखिल भगत यांनी जनसेवा विकास समितीत प्रवेश केला व त्यांना समितीने उमेदवारी दिली. भगत यांना तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि भारतीय जनता पक्ष यांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे तळेगाव नगरपरिषदेच्या इतिहासात पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड होत असल्याची घटना पहिल्यांदाच घडत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे या भारतीय जनता पक्षाच्या असून उपनगराध्यक्ष संग्राम काकडे हे जनसेवा विकास समितीचे आहेत. बुधवारी (दि.29) नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड होत असून आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like