Talegaon Dabhade : दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा ताळेबंद मांडण्याची गरज- पोपटराव पवार

एमपीसी न्यूज- पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारने पाण्याचा ताळेबंद मांडल्याने येथील दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. जलसंवर्धन हा महत्त्वाचा भाग असून पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वांनी राबविला पाहिजे. पर्यावरण विषयावर भर दिल्यास विद्यार्थ्यांनाही वास्तवाची जाणीव होण्यास चांगली मदत होईल असे मत आदर्श ग्राम कार्यक्रमाचे निदेशक आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘वन मृद पाणी युवकांचे योगदान’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व शिक्षण महर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, खजिनदार चंद्रकांत शेटे, नियोजन समिती अध्यक्ष विलास काळोखे, विश्वस्त शैलेश शाह, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी उपस्थित होते.

पोपटराव पवार यांनी यावेळी हिवरे बाजार गावाची दुष्काळी गाव ते आदर्श गाव अशी झालेली वाटचाल मांडली. हिवरे गावाच्या वैशिष्टय़ांची उकल विद्यार्थ्यांसमोर केली. पवार म्हणाले, ” 1990 पूर्वी गावाची भयानक परिस्थिती होती, या ठिकाणी जेमतेम साडेतीनशे चारशे मिलिमीटर पाऊस होतो. त्यात पावसाळी पिकं थोडीफार घेतली जायची. जमिनीची धूप, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य, जनावरांचा चारा उपलब्ध नव्हता, जळणासाठी लाकूड नव्हते. अशा परिस्थितीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते. हाताला काम नाही, त्यातून गुन्हेगारी वृत्ती वाढली होती. व्यसनाधीनता बळावली होती. लोक दारू गाळायचे आणि विकायचे. तो काही लोकांचा उत्पन्नाचा मार्ग झाला. दारूमुळे होणारे सर्व वाईट परिणामही दिसू लागले. हिवरेबाजारचे नाव यामुळे खराब झाले होते. हिवरेबाजारला बदली झाली कि त्या अधिकाऱ्याला ती ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ वाटे. शिक्षणाचा अभाव, आरोग्यविषयक गोष्टींचा अभाव यामुळे हिवरेबाजारचे नाव खराब झाले.

मात्र आज हिवरे बाजारने पाण्याचा ताळेबंद मांडल्याने येथील दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. आज आदर्श गाव म्हणून हिवरे बाजारचे नाव घेतले जाते. आनंददायी आणि आदर्श गावाची प्रगती पाहण्यासाठी जगातील लोकांची येथे गर्दी होते. गावात एकही पुतळा नाही, शाळेतील मुले आणि गावकरी मिळून गावाची स्वच्छता करतात. त्यामुळे ‘हिवरे गावाला नक्की या’” असे पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले.

पोपटराव म्हणाले की, आज जगभर पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. 300-400 फुटांच्या पुढे भूगर्भातील पाणीपातळी गेली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या संतांनी, राष्ट्रपुरुषांनी अवलंबलेली जलनीती राबविणे आवश्यक आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ग्रामगीता वाचली पाहिजे केवढी मोठी विश्वासाची नैतिकता आपल्याला या राष्ट्रपुरूषांनी दिली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेला राज्यात, देशात तसेच परदेशातही विशेष मानतात. दुष्काळ पडला असताना जगाच्या दुष्काळात पहिली कर्जमुक्ती संत तुकाराम महाराजांनी केली आहे. पण सध्या राष्ट्रपुरूषांना जातीधर्मामध्ये गुंफले गेले आहे ही दुर्दैवाची बाब आहे. आज ज्या भागात जास्त पाऊस पडतो, त्याच भागात पाणीटंचाई दिसते आहे. योग्य नियोजन करून पाण्याचे पुनर्भरण करता येते, ते करणे काळाची गरज आहे.

पावसाच्या पाण्याबरोबर अमाप माती वाहून जाते. कुठल्याही प्रतिकुल परिस्थितीत मात करून हिरवं शिवार फुलवू शकतो. हा आदर्श अभ्यास करावा हे टोकीयो विद्यापीठात शिकविले जाते. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे. त्यामुळे पाणी पुनर्भरणासोबतच मातीसंवर्धन करणेही निकडीचे आहे. वनसंपदा जपली पाहिजे, तरच पर्यावरण टिकेल, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी निरोगी व निर्व्यसनी राहावे. प्रेरणेला कृतीची जोड दिल्याशिवाय नीती व मूल्ये जपता येत नाहीत, असा सल्ला देत विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारत बोलते केले. मोबाइल, इंटरनेटपुढील पिढ्यांना देताना त्याच्या वापरासाठी योग्य संस्कारही देण्याची गरज आहे; अन्यथा नैराश्यातून व्यसने जडण्याचा मोठा धोका आहे. नेमकं कुठल्या दिशेने जायचंय हे ठरविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या खेळाडूंना पोपटराव पवार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रभान खळदे, नंदकुमार शेलार, निरूपा कानिटकर, संदीप काकडे आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा अशोक जाधव यांनी केला. प्रास्ताविक महाविद्यालय विकास समिती सदस्य संदीप काकडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा आर आर डोके व प्रा दीप्ती कन्हेरीकर यांनी केले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रभान खळदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.