Pimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग एक)

(श्रीपाद शिंदे)

एमपीसी न्यूज – इंटरनेट हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दैनंदिन जीवनातले बहुतांश व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातूनच होतात. बँकिंग, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय, जनसंपर्क या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने करामत केली आहे. इंटरनेटमुळे मानवी जीवन सुखकर झाले हे खरे, पण अपुऱ्या माहितीमुळे हे सुखकर वाटणारे जीवन धोकादायक बनत आहे. इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विकासासोबत सायबर साक्षरता देखील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी महत्वाची बाब बनली आहे. उत्तमरीत्या मोबाईल आणि संगणक वापरता येणं म्हणजे सायबर साक्षर असणं हा भ्रम प्रथम काढून टाकायला हवा. सायबर सुरक्षेवर आधारित तीन लेखांची मालिका….

पहिल्या भागात सायबर युग, त्याचा इतिहास आणि वर्तमान, सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यात अडकू नये म्हणून घ्यावयाची काळजी देण्यात आली आहे. त्यानंतर दुस-या भागात महिला व बालक कशा पद्धतीने सायबर गुन्ह्यांचे सॉफ्ट टार्गेट होतात, त्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना आणि कायद्याची माहिती घेणार आहोत. तर तिस-या भागात सायबर गुन्हेगारीवरील प्रतिबंधात्मक उपाय आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि आपत्कालीन संपर्काची चर्चा करणार आहोत.

1998 मध्ये एका अनोळखी सॉफ्टवेअर प्रोग्रामने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संगणक क्षेत्रात प्रवेश केला. यामुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. या सॉफ्टवेअर प्रोग्रामला यापूर्वी कुणीही कधीही पाहिलेलं नव्हतं. तसेच या सॉफ्टवेअर प्रोग्रामबाबत कोणती माहिती देखील उपलब्ध नव्हती. यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा धक्का बसला. पाकिस्तान मधील लाहोर येथून या व्हायरस प्रोग्रामची सुरुवात झाली. 1998 साली आलेल्या सूक्ष्म प्रोग्रामचे नाव ‘सी ब्रेन’ असे होते. हा जगातील पहिला व्हायरस म्हणून ओळखला जातो.

या व्हायरसची कहाणी अशी आहे की, ‘लाहोर शहरात अमजद आणि बसित हे दोघे भाऊ रहात होते. या दोघांनी सी-अशर आणि सी ब्रेन नावाचे दोन व्हायरस बनविले. लाहोर मध्ये त्यांचे एक दुकान होते. त्या दुकानातून ते संगणकाचे नकली सॉफ्टवेअर प्रोग्राम विकत होते. त्यांच्या दुकानात महागडे सॉफ्टवेअर अतिशय किरकोळ दरात मिळत असल्याने पश्चिमी देशातील दुकानदार त्यांच्या दुकानातून सॉफ्टवेअर खरेदी करत होते. नकली सॉफ्टवेअर खरेदी करणा-या लोकांना धडा शिकविण्यासाठी अमजद आणि बसित यांनी त्यांचे व्हायरस त्या सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या माध्यमातून संक्रमित केले. ‘सी ब्रेन’ हा व्हायरस आजपर्यंत सर्वात जास्त चर्चेत असणारा व्हायरस आहे. सुमारे दीड लाख संगणकांना त्याने बाधा पोहोचवली आहे.

2004 साली भयंकर व्हायरस हमला झाला. त्यानंतर कित्येक तास सर्व वेबसाईटवर ‘डिनायल ऑफ सर्व्हिस’ हा संदेश येत होता. कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या संगणक तज्ञांनी सुमारे अडीचशे भारतीय वेबसाईट हॅक केल्या होत्या. 6 फेब्रुवारी 2000 रोजी याहू डॉट कॉम ही वेबसाईट सुमारे तीन तास बंद होती. दुस-या दिवशी बाय डॉट कॉम (boyz) या वेबसाईटवर हल्ला झाला. त्याच रात्री अॅमेझॉन डॉट कॉम आणि सीएनएन वर देखील सायबर हल्ला झाला. इथून सायबर हल्ले आणि सायबर गुन्हेगारीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. सायबर गुन्हेगारीची व्याप्ती एवढी वाढली आहे की, प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्यासाठी स्वतंत्र विभाग आणि कर्मचा-यांची नियुक्ती करावी लागत आहे. माहिती तंत्रज्ञात क्षेत्राने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी असली तरी त्यासोबत आलेली ही गुन्हेगारी वृत्ती चिंताजनक आहे.

इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन गेम्स, मनोरंजन, शिक्षण, ऑनलाईन संवाद, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून आपला दैनंदिन जीवनात इंटरनेटचा संबंध येतो. संगणक, इंटरनेट किंवा मोबाईल फोनचा वापर करून वैयक्तिक पातळीवर किंवा संस्थात्मक पातळीवर गैरकृत्य केले जाते. सोशल नेटवर्किंग साईट्स, ई-मेल, चॅटरूम, पायरेटेड सॉफ्टवेअर, वेबसाईट इत्यादी प्लॅटफॉर्मचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी होत आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर वावरत असताना काळजी घेणे आवश्यकच आहे. आपल्या मोबाईल आणि संगणकाच्या स्क्रीनवर आपण टाकत असलेला पासवर्ड आपल्याला तारांकित दिसतो. याचा अर्थ तो कुणालाच समजणार नाही. पण तसे होत नाही. संगणकाचा चांगला जाणकार हा पासवर्ड अगदी सहज पाहू शकतो. त्यातून गैरवापर होऊ शकतो.

वैयक्तिक माहितीची सुरक्षा तसेच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बँकिंग (युपीआय, एटीएम पिन, ओटीपी सीव्हीव्ही नंबर), समाज माध्यमं (व्हाट्स अप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर इत्यादी), शैक्षणिक (यु ट्यूब, अनअकॅडमी, दीक्षा इत्यादी), पेमेंट गेटवे (गूगल पे, पे पल, पेटीएम, फोन पे इत्यादी) याबाबत सायबर सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारीचे प्रकार आणि सुरक्षा याबाबत पुढील भागात…..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.