Pimpri: अवैध बांधकाम शास्तीकरापोटी 242 कोटी रुपये वसूल

महापालिकेतर्फे 86 हजार मालमत्तांना शास्तीकराची आकारणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 86 हजार 412 अवैध मालमत्तांना शास्तीकर आकारण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत 242 कोटी 53 लाख रुपये शास्तीकर वसूल केला आहे. अवैध बांधकामावरील शास्तीकर सवलत 352 कोटी 47 लाख रुपये आहे. शिल्लक मागणी 285 कोटी 72 लाख रुपये आहे. दरम्यान, एक हजार चौरस फुटाच्या शास्तीमाफीचा 54 हजार 531 मिळकतींना फायदा झाला आहे. त्यांना 195 कोटी 6 लाख रुपये सवलत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात एकूण पाच लाख 14 हजार 190 मालमत्ता आहेत. त्यामधील 4 लाख 36 हजार 285 निवासी मालमत्ता आहेत. महापालिका क्षेत्रात 4 जानेवारी 2008 नंतर झालेल्या अवैध बांधकामांना शास्तीकर लागू करण्यात आला होता. राज्य सरकारने सुरवातीला शास्ती करामध्ये 600 चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना माफी दिली होती. तर, 601 ते 1 हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांसाठी शास्तीकरात 50 टक्के सवलत दिलेली होती. दरम्यान, 4 मार्च 2019 रोजी सरकारने काढलेल्या आदेशानुसार एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकामांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्तीकरात माफी दिली आहे.

शहरातील एकूण 86 हजार 412 मालमत्तांना शास्तीकर आकारण्यात आलेला आहे. शास्तीकरापोटी एकूण मागणी 880 कोटी 72 लाख रूपये आहे. 242 कोटी 53 लाख रूपये शास्तीकर वसूल झालेला आहे. अवैध शास्तीकर सवलत 352 कोटी 47 लाख रूपये इतकी आहे. शिल्लक वसूल रक्कम 285 कोटी 72 लाख रूपये इतकी आहे. एक हजार चौरस फुटाच्या शास्तीकर माफीच्या निर्णयाचा 54 हजार 531 मालमत्तांना फायदा झालेला आहे. त्यांना 4 नोव्हेंबर 2019 अखेर दिलेली सवलत 195 कोटी 6 लाख रुपये इतकी आहे.

1001 ते 2000 चौरस फुट निवासी क्षेत्रफळाच्या 12 हजार 89 मालमत्ता असून त्यांची एकूण थकबाकी 99 कोटी 83 लाख रूपये आहे. त्यापैकी अवैध बांधकाम शास्तीकर 31 कोटी 96 लाख रूपये आहे. 8 मार्च 2019 च्या सरकारी पत्रानुसार अवैध बांधकाम शास्तीमध्ये सवलत दिलेल्या तथापि, अद्याप मालमत्ता कर न भरलेल्या एकूण 45 हजार 644 मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे एकूण मागणी 171 कोटी 74 लाख रूपये आहे. यामध्ये 31 कोटी 96 लाख रूपये इतक्या अवैध बांधकाम शास्तीकराचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना कर संकलन विभागाने ही माहिती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.