Bhosari : इंद्रायणी थडी जत्रेत चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे जनजागृती स्टॉल

एमपीसी न्यूज- भोसरी येथे भरविण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या इंद्रायणी थडी जत्रेमध्ये चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने जनजागृती स्टॉल लावण्यात येणार असून या ठिकाणी सोसायटीधारकांना आपल्या हक्कांची माहिती करुन दिली जाणार आहे. अशी माहिती फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी दिली.

सोसायटीधारकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्‍हावे. याकरिता चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत जनजागृती स्टॉल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भोसरीसह पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मनोरंजन, खेळ, खाद्यपदार्थांच्या मेजवाणीसह आपल्या हक्कांची जाणीव करुन देणारी ही जत्रा सोसायटीधारकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी जत्रा भरविण्यात येणार आहे. दि. 30 जानेवारी ते 2 फेब्रवारी दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 10 या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

या जत्रेमध्ये मनोरंजन, खेळ, ऐतिहासिक पौराणिक देखावे, खाद्यपदार्थ, महिला बचतगटांची उत्पादने ठेवण्यात येणार असून या जत्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याची प्रचिती येणार आहे. यंदा प्रथमच इंद्रायणी थडीमध्ये चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून सोसायटीधारकांना आपल्या हक्कांची माहिती करुन घेता यावी म्हणून स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार आहे.

चिखली-मोशी-चऱ्होली परिसरातील सोसायटीधारकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी हाउसिंग सोसायटी फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोसायटीधारकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आणि सोसायटीधारकांना मदत करण्यासाठी फेडरेशन काम करीत आहे. रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी सोसायटीधारकांना सहकार्य करण्यात येते, असेही सांगळे यांनी सांगितले.

सदनिका घेताना कोणत्या कागदपत्रांची चौकशी करावी? कोणती काळजी घ्यावी? घर घेतल्यानंतर सोसायटी कमिटीने कशाप्रकारे काम करावे? त्याचे अधिकार काय? सोसायटीमधील सभासदांचे अधिकार काय? त्याचप्रकरणे बांधकाम व्यावसायिकाकडून सोसायटीचे ‘हॅन्डओव्‍हर’ करीत असताना काय काळजी घ्यावी? कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी. तसेच, मालमत्ता हस्तांतरण कसे करावे ? या सर्व मुद्यांवर कायदेशीर मार्गदर्शन व मदत मोफत देण्यात येणार आहे. परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थांनी चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे सभासद होवून आपल्या न्याय्य हक्काच्या लढ्यात सहभागी व्‍हावे, असे आवाहन फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.