Wakad : एटीएम फोडले; घटनेनंतर एटीएमला आग, आठ लाखांची रोकड गायब (Update News)

एमपीसी न्यूज – वाकड येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापून रोकड चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार आज, सोमवारी (दि. 27) सकाळी दत्त मंदिर रोड वाकड येथे उघडकीस आला आहे. मशीन कापून चोरट्यांनी आग लावली असल्याने पैसे चोरून नेले की जळून गेले, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, वाकड पोलिसांकडून मशीनमध्ये कॅश नसल्याचे सांगण्यात आले आहे.

वाकड येथे दत्त मंदिर रोडला आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँकेचे दोन एटीएम सेंटर आहेत. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापून चोरट्यांनी त्यातून आठ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही रोकड चोरटे घेऊन गेले की मशीनला आग लागल्यानंतर रोकड जळून खाक झाली; याबाबत पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांना सांगता येत नाही. परंतु मशीनमध्ये असलेले आठ लाख रुपये आता तेथे नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. वाकड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तमंदिर रोडवर ही घटना उघडकीस आली आहे.

रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस आणि वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील तीन महिन्यांपासून वारंवार एटीएम फोडण्याच्या आणि एटीएम चोरीच्या घटना घडत आहेत. या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. मात्र, या तपास पथकाच्या हाती देखील अद्याप कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.