Pimpri: ‘एमआयडीसीती’ल लघुउद्योजकांच्या विजेच्या समस्या सोडवू – उर्जामंत्री नितीन राऊत

पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेने घेतली उर्जामंत्र्यांची भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज विषयक समस्या मार्गी लावल्या जातील. उद्योजकांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेला दिले.

लघुउद्योजकांच्या प्रश्नांबाबत पिंपरी-चिंचवड लघु संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उर्जामंत्री नितीन राऊत यांची नुकतीच मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, संघटनेचे संचालक संजय सातव, उद्योजक संजय भोसले, माणिकराव पडवळ यांचा समावेश होता. यावेळी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे उर्जामंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

वीज दरवाढीमुळे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. नवीन दर वाढीमुळे महाराष्ट्रामध्ये उद्योग चालवणे अशक्य होणार आहे. त्यामुळे औद्योगिक वीजदरवाढ करण्यात येऊ नये. औद्योगिक परिसरामधील इन्फ्रास्ट्रक्चर जुने झाले आहेत. जुन्या ओवर हेड वायर तुटून व कमी क्षमतेच्या विद्युत रोहित्रावर जादा भार दिल्यामुळे औद्योगिक परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. उद्योजकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्याकरिता जादा क्षमतेचे विद्युत रोहित्र बसवावेत. औद्योगिक परिसरामधील सर्व ठिकाणच्या ओवरहेड वायर काढून त्याठिकाणी भूमिगत केबल टाकून वीज पुरवठा करावा.

औद्योगिक परिसरामधील डीपी फिडर झाकणे चोरीला गेल्यामुळे फिडर उघडी पडली आहेत. त्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात. सर्व डीपी फिडरला झाकणे बसवावीत. औद्योगिक परिसरातील मंदीचे वातावरण पाहता उद्योजकाला वीजबिलाचे हप्ते करून बील भरण्याची सवलत द्यावी. उद्योजकाचे वीज बिलाचे धनादेश काही कारणास्तव परत गेल्यास त्या उद्योजकाची धनादेशाने वीज बिल भरण्याचा कालावधी एक महिनावर आणावा.

औद्योगिक परिसर व त्यालगत असलेल्या झोपडपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी व वीज गळती होते. वीज गळतीचे प्रमाण कमी करून वीज चोरावर कडक कारवाई करावी. नवीन वीज निर्माती प्रकल्प चालू करावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन लघुउद्योग संघटनेने दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.