Dighi : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणार्‍यावर कारवाई करणाऱ्या उपनिरीक्षकास धक्काबुक्की; नोकरी घालवण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कारमधून बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई केल्याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी कारवाई करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की केली. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन नोकरी घालवण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री सव्वाआठच्या सुमारास गणेश नगर बोपखेल येथे घडली.

पोलीस उपनिरीक्षक कुणाल बालाप्रसाद कुरेवाड यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र रवींद्र वाघमारे (वय 45, रा. रामनगर, बोपखेल) याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कुरेवाड यांना आरोपी महेंद्र याचा मुलगा स्वप्नील वाघमारे (वय 21) हा इनोवा कारमधून दारू विक्री करत असताना आढळला. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारणावरून आरोपी महेंद्र वाघमारे यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. तसेच माझी गाडी व मुलाला का ताब्यात घेतले, असे विचारत पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड यांच्या अंगावर धावून येत धक्काबुक्की केली. आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड आरोपीला समजून सांगत असताना आरोपीने ‘मी दलित पॅंथर माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. तुमची नोकरी घालवू शकतो. तुमच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करतो.’ अशी धमकी दिली याबाबत आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.