Talegaon Dabhade : प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जीवघेण्या कॅन्सरवर तिने केली मात

अश्विनी अकोलकर लिखित 'होय, मी शतायुषी होणार' पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’या गीताच्या ओळी एका कॅन्सरग्रस्त तरुणीने तंतोतंत खऱ्या करून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर विजय मिळवित ती सगळ्यांची प्रेरणा बनली आहे. अश्विनी अकोलकर असे या तरुणीचे नाव आहे. उपचारांच्या मदतीने साडेपाच वर्षे झुंज देऊन कॅन्सरला नतमस्तक करायला लावणाऱ्या अश्विनीला केवळ जगावे कसे हेच उमगले नाही तर, या जगण्याच्या प्रेरणेने तिला लिहिते केले आहे. तिच्या अनुभवाचा ठेवा आता वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. ‘होय, मी शतायुषी होणार’ या तिने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच दीपक गंगोळी यांच्या हस्ते तळेगाव येथील नाना-नानी पार्कमधील बवले सभागृहात नुकतेच करण्यात आले.

यावेळी शिक्षणतज्ज्ञ प्रा. प्रकाश बोकील, डाॅ. योगेश पंचवाघ, लेखिका अश्विनी अकोलकर उपस्थित होते.

ही संघर्षगाथा आहे तळेगावातील अश्विनी अकोलकर या तरुणीची ! जीवनातील ऐन उमेदीचे वय अवघ 22 वर्षे, आयुष्याची दुसरी इनिंग सुरुवात करण्याच्या उंबरठ्यावर असताना कॅन्सरने गाठले आणि ग्रासले. रूबी हॉल हॉस्पिटलचे डॉ.मिनीश जैन यांनी तिच्यावर केमोथेरपीचे उपचार केले. डॉ. संजय देशमुख यांनी फुफ्फुसाच्या चार अवघड शस्त्रक्रिया केल्या. ज्यांच्यामुळे आता खरी जगण्याची सेकंड इनिंग सुरु झाल्याची कृतज्ञता अश्विनीने व्यक्त केली. याबरोबरच स्वानुभव लिखाणास प्रवृत्त करणारे प्रा. शिरीष अवधानी यांचे अश्विनीने ऋण व्यक्त केले.

“जीवन जगताना अनेक विकृत आणि नको त्या विचारांचे संकलन आपल्या मनात होते. हा कचरा कसा फेकून द्यावा आणि तृप्त व आनंदी जीवन कसे जगावे हे मला कॅन्सरमुळे समजले. माझ्या जीवनातील प्रत्येक दिवस हा एक चमत्कार आहे. सध्या जीवन जगण्यात मी इतकी व्यस्त आहे की मरणाचा विचार करायला मला वेळच नाही” अशी प्रतिक्रिया अश्विनी हिने दिली.

शिक्षणतज्ज्ञ प्रा. प्रकाश बोकील म्हणाले, ” दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण व निर्णय, निश्चय, जिद्द आणि स्वयंप्रेरणा यांचे अश्विनी हे प्रतीक असून छोट्याश्या संकटामुळे जीवन त्यागणाऱ्यांना अश्विनीने या संघर्षातून सणसणीत चपराक लगावली असून शीर्षकातच आत्मविश्वास असलेले प्रत्यक्ष अनुभवावरील हे पुस्तक आहे. कॅन्सरग्रस्त अथवा असाध्य रोगाने ग्रासलेल्या, निराशेच्या गर्तेत अडकलेल्या रुग्णांना जगण्याची नवी प्रेरणा देणारे लिखाण अश्विनी अकोलकर यांनी केले आहे. संकटांना न घाबरता त्यावर मात कशी करावी ? स्वतःच आजारपण उगाळत न बसता, स्वतःचे गाऱ्हाणे इतरांसमोर न गाता आपल्या भोवतीचं जग सुंदर कसं करावं हे त्या यातून शिकवतात” अश्विनीवर उपचार करणारे देवदूत निरपेक्ष वैद्यकीय सेवेचा वसा जपत आहेत. आरोग्य क्षेत्रातील महान सेवाव्रती म्हणून डाॅक्टरांचे त्यांनी कौतुक केले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डाॅ. योगेश पंचवाघ यांनी अश्विनीच्या धैर्याचे कौतुक केले. पुस्तक प्रकाशनाच्या दिवशीच प्रथम आवृत्तीच्या पाचशे प्रती हातोहात खपल्या. विशेष म्हणजे पुस्तक विक्रीतून मिळालेले पैसे कॅन्सरग्रस्तांना मदत म्हणून दिले जाणार असल्याचे लेखिका अश्विनी अकोलकर यांनी जाहीर केले. कॅन्सरचे भांडवल करुन दुबळेपणा, दीनपणा अथवा दयेची याचना करण्याऐवजी अश्विनीने लिहिलेले ‘होय, मी शतायुषी होणार’ या असाध्य रोगांशी लढा देणाऱ्या असंख्य रुग्णांना व जीवनाप्रती आसक्ती बाळगणाऱ्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारे आहे.

सूत्रसंचालन विनय केसकर यांनी केले. प्रकाशक व अश्विनीचा भाऊ अमोल अकोलकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.