Pune : पाच दिवसात 1600 किमी नाशिक-अमृतसर थरारक प्रवास करणारी पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के

(विश्वास रिसबूड)

एमपीसी न्यूज- अत्यंत प्रतिकूल हवामान, कठीण परिस्थितीमध्ये सहनशक्तीची परिसीमा, मानसिक सामर्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर पुण्याच्या प्रीती मस्के हिने सायकलवरून अलीकडेच नाशिक ते अमृतसर 1600 किमीचे अंतर अवघ्या पाच दिवसामध्ये पूर्ण केले. ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करणारी ती एकमेव महिला सायकलपटू आहे. वयाची चाळीशी उलटल्यानंतर सायकल चालविण्यास सुरुवात केलेल्या प्रितीने या मोहिमेसाठी 5 days SR super Randonneur होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

या थरारक आणि आव्हानात्मक प्रवासाचा अनुभव प्रितीने एमपीसी न्यूजबरोबर शेअर केला. ” डिसेंबर महिन्यात ठाणे मॅरेथॉनमध्ये गेलेले असताना त्याठिकाणी सायकलपटू रतन अंकलकर भेटला. त्याने त्यावेळी मला 5 दिवसामध्ये नाशिक ते अमृतसर 1600 किमी सायकल मोहिमेबद्दल माहिती दिली. आणि त्यामध्ये तू सहभाग घ्यावा असे त्याने मला सुचवले. मी त्याला वेड्यात काढले. कारण 160नोव्हेम्बर ते 3 डिसेंबर दरम्यान मी काश्मीर ते कन्याकुमारी असा 3800 किमीचा सायकलप्रवास पूर्ण करून परत आले होते. त्यामुळे पुरेशी विश्रांती न घेता पुन्हा नवीन मोठे आव्हान घेणे म्हणजे मूर्खपणा आहे असे मला त्यावेळी वाटले. पण डोक्यात या मोहिमेचे विचार स्वस्थ बसू देत नव्हते”

“या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हायचच असं मी ठरवलं खरं पण घरून परवानगी मिळेल की नाही याबद्दल साशंकता होती. मी माझ्या मिस्टरांना या मोहिमेबद्दल माहिती दिली आणि सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. शिवाय कोणत्याही महिलेने आजपर्यंत असे एसआर पूर्ण केले आहे असे मला वाटत नाही. मिस्टर म्हणाले ‘आत्ताच काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करून आलेली आहेस आता या मोहिमेमध्ये आणखी नवीन काय असणार आहे ?’ अखेर दोन दिवस आधी परवानगी मिळाली आणि माझा जीव भांड्यात पडला. तुम्ही मनापासून एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत असाल तर तुम्हाला ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला”

“सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली. ऑडॉक्स इंडिया पॅरिसचे नूतनीकरण केले जाणारे शुल्क भरले व नाशिक अमृतसर ग्रुपमध्ये दाखल झाले. पुण्यातील ग्रुपचा फोन आला व त्यांच्या कॅबमध्ये नाशिकला जाण्यासाठी सहभागी होऊ शकते असे ते म्हणाले. नोकरीमधील ऑफिसची प्रलंबित कामे पूर्ण करून माझे सामान पॅक केले. 25 डिसेंबर सकाळी 9 वा आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो. आदल्या दिवशी सायकलपटूंना ब्रीफिंग करण्यात आलं. राजस्थानमधील एका सायकलपटूने थंड हवामान आणि धुक्यात सायकल चालवण्याचा अनुभव सांगितला. तो ऐकल्यानंतर मात्र थोडी भीती वाटू लागली. आपण खूप मोठे धाडस तर करीत नाही ना ? अशी शंका मनात आली. पण पुढच्याच क्षणी आव्हान स्वीकारायला मन तयार झालं. डॉ. महाजन यांनी सायकल मार्ग, हवामान, नियम अटी गोष्टींविषयी थोडक्यात माहिती दिली. या मोहिमेसाठी 25 सायकलपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये मी एकटी महिला होते”

“दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबरला नाशिकहून सकाळी 6 वाजता बीआरएमचे ध्वजारोहण झाले. बीआरएमचा रस्ता नाशिक – धुलिया-शिरपूर – सेंधवा रतलाम – मानपूर – निमचे रस्ता – मंदसौर असा होता. जवळपास याच मार्गाने आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी (के के राईड )गेलो होतो पण यावेळी महाराष्ट्र ते मध्यप्रदेश. असा उलट प्रवास 365 कि.मी. कंट्रोल पॉईंटच्या आधी उंच उभा घाट विभाग होता. हा घाट के.के. राईडवर असताना उतरला होता. मला आठवत त्यावेळी मी म्हणाले होते की हा घाट कोण चढेल तो एक उत्तम सायकलस्वार असेल. आणि 15 दिवसातच तोच घाट मी चढत होते”

“365 कि.मी. सायकलिंग केल्यानंतर आम्ही सर्वजण पहाटे 3 वाजता हॉटेलवर मानपुर येथे पोहचलो. दहा किमीपेक्षा जास्त लांबीचा घाट आणि 1600 मीटर पेक्षा जास्त उंची म्हणजे मोठे आव्हान आम्ही पूर्ण केले होते सोबतच्या सायकलपटूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. तीन तासाच्या विश्रांतीनंतर समजले की पुणे आणि नाशिकचे सायकलस्वार सर्वजण एका तासापूर्वी पुढे गेले आहेत. सकाळी 7 वा पुन्हा सायकलिंगला सुरुवात केली. प्रथम 35 कि मी रस्ता खूपच खराब होता. नंतर पुढच्या कंट्रोलपॉइंटसाठी जायला महामार्गावर पोहोचलो. वाटेने बरेच चालकांना परत भेटले व पुढच्या कंट्रोलपॉइंटला पोहोचले. दुपारच्या जेवणानंतर दुपारी 1 वाजता पुन्हा सायकलिंग सुरुवात केली. जेवणानंतर वेग मिळू शकत नव्हता. हळू हळू पेडलिंग चालू ठेवले होते. मग मात्र झोप अनावर झाल्यामुळे दोन ब्रेक घेतले आणि शेवटच्या कंट्रोलपॉइंटच्या आधी 18 कि.मी. अगोदर बरेच सहकारी परत भेटले त्यांच्यासह 37 तासात 600 की मी ची बी.आर.एम यशस्वीरित्या पूर्ण केली. आमच्या स्वागतासाठी मुधोळकर सर तिथे हसतमुख चेहऱ्याने हजर होतेच. त्यांनी आम्हाला रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन गेले. ती एक माहेश्वरी धर्मशाला होती. हवेमध्ये प्रचंड गारवा होता. त्यानंतर आम्ही लोक रात्रीचे जेवण करून झोपी गेलो. बऱ्याच अडचणींवर मात करीत वेळेपूर्वी बीआरएम संपवल्यामुळे आम्ही सर्वजण आनंदी होतो”

“दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचंड थंडी वाजत होती म्हणून सकाळी सव्वासात वाजता BRM सुरू करण्यात आली. उशीर झाल्यामुळे आता थंडी वाजणार नाही या समजुतीने मी थर्मल, वूलन सॉक्स आणि ग्लोव्ह्जही घातले नाहीत ओझे नको म्हणून टेम्पो मध्येच ठेवून दिले. परंतु नंतर मात्र गारवा खूप असल्यामुळे सायकल चालवताना हाताची बोटे आखडून गेली होती. थंडीचा संपूर्ण जामानिमा न करता आपण मोठी चूक केली हे कळून आता उपयोग नव्हता. बोटे थंडीने गारठली होती. तेवढ्यात एका ठिकाणी काही माणसे शेकोटी पेटवून उब घेताना दिसली. मी देखील हात शेकण्यासाठी थांबले. उष्णता लागताच बोटातून सुया टोचाव्यात अशा प्रचंड कळा आल्या. एका माणसाने दोन प्लास्टिकच्या पिशव्या आणल्या आणि दोऱ्याने माझ्या दोन्ही हाताला बांधल्या. त्यानंतर अर्धा तास घालवून पुन्हा प्रवास करण्याचा निर्णय घेतला”

“मंदसौर- चित्तोडगड -भिलवारा-रूपेली मार्ग 180 मीटर उंचीसह सपाट होता. 204 किमीवर असलेल्या कंट्रोल पॉइंटवर पोहोचण्यासाठी आम्हाला 11तास 34 मिनिटे लागली. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे रस्त्यावर गर्दी होती. कंट्रोल पॉइंटवर प्रवास संपल्यानंतर एका ढाब्याजवळ उभे राहून आम्ही टेम्पोची वाट पाहत थांबलो. चिप्सचे पाकीट घेण्यासाठी मी आत निघाले असता एका काळ्या मोठ्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मी घाबरून पडले. सुदैवाने त्या कुत्र्याचे दात लागले नाहीत अथवा मोठी इजा झाली नाही नाहीतर नसता अनर्थ ओढवला असता. माझ्या आवाजाने ढाब्यावरील सरदारजी माझ्या मदतीसाठी धावून आले”

“या ढाब्यापासून 17 किमी वर एका हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. आमच्यापैकी काहीजण सायकलवरून तर काहीजण टेम्पोमधून हॉटेलवर पोहोचलो. हॉटेलवर पोहोचल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटू लागले. जेवण करून झोपायला रात्रीचे 11 वाजले. दुसऱ्या दिवशी 400 किमीचा बीआरएम होता. 28 डिसेंबर रोजी सकाळी लवकर उठून प्रत्येकजण थर्मल वैगेरे जामानिमा करून राइडसाठी सज्ज झाला होता. अशा थंडीपासून वाचवण्यासाठी तीन लेअर कपडे घातले होते. हवेमध्ये प्रचंड गारवा होता. मुधोळकर सरांना थंडीपासून बचावासाठी उपाय म्हणून सर्जिकल ग्लोव्हज आणण्यास सांगितले होते तेही परिधान केले”

“सकाळी सव्वासहा वाजता फ्लॅगऑफ होता. सर्वांना शक्य तेवढ्या लवकरात लवकर BRM संपवावी लागणार होती. कारण नंतर दोन दिवसामध्ये 700 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार होता. त्यामुळे विश्रांती आवश्यक होती. आमचा मार्ग रुफली – मकराना – लाडुन -बिससर राजस्थान असा होता. काही सायकलस्वार चुकून पुढे अजमेरकडे निघाले पण आम्हाला पंजाबच्या दिशेने जायचे होते. रात्रीच्या आत जास्तीत जास्त अंतर गाठायला पाहिजे म्हणून 122किमी सायकलिंग केल्यानंतर दुपारच्या जेवणाशिवाय ताबडतोब प्रवास करण्याचा निर्णय घेतला”

“किरकोळ खाऊन संध्याकाळी साडेपाच वाजता 205 किमी अंतर पार केले. पुढे लाडुन रस्ता अंधारमय होत होता आणि अतिशय कमी रहदारी होती. रस्त्यावरील मागून येणाऱ्या लोकांनी मला सांगितले की सायकल चालक माझ्यापासून 20 कि.मी. मागे आहेत, म्हणूनच अंधारात एकट्याने कंट्रोल पॉइंटवर पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्याचदिवशी मला दोनवेळा स्थानिक लोकांचा थोडा वाईट अनुभव आला. या भागात स्त्रिया संध्याकाळी एकट्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळ येथील लोकांना माझे असे एकटयाने असे सायकलवर जाणे आवडले नाही हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले”

” एका माणसाने तर अनेक प्रश्न विचारून त्रासून सोडले. लाडुन ते सुजनगड कंट्रोल पॉईंट एक हा 16 किमी वर होता. रात्री 7 वाजण्यापूर्वी हा रस्ता गोंधळात टाकत असल्यामुळे मी सरळ पोलीस स्टेशन गाठले. त्यांना पत्ता विचारला. त्यानी व्यवस्थित समजून सांगितलं. 16 किमी अंतर एकटयाने अंधारात चालवणे खूपच अवघड होते. थोड्याच वेळात मी कंट्रोल पॉइंटला पोहोचले. माझ्याकडे खूप वेळ होता आणि आता रात्री सायकल चालवायला एखाद्या ग्रुपची वाट पाहायची होती”

“थोड्यावेळात दोन सायकलस्वार आले त्याचे जेवण झाल्यावर आम्ही तिघांनी पुढील प्रवास चालू केला. आणि थोडे अंतर सायकल चालवल्यावर एकाला झोप येऊ लागली म्हणून बंद हॉटेलंजवळ थोडा वेळ थांबलो व पुढे निघालो. परत एकदा एका धाब्यावर थांबलो काही वेळ झोप घेतल्यानंतर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास उठून पाहिले तर सर्वत्र दाट धुके व तापमान 0 डिग्री पर्यंत खाली गेले होते. परंतु कोणीही डीएनएफ व्हायला नको म्हणून पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली. तो आमच्यासाठी भयानक अनुभव होता. रात्रीच्या अंधारात आम्हाला धुक्यामुळे 5 ते 10 फूट अंतरापर्यंतचे देखील दिसत नव्हते. आम्ही सर्वजण एका मागून एक सायकल चालवत होतो फक्त सायकलचे मागील लाईट दिसत होते. असे वाटले की आम्ही बर्फाच्या एका बोगद्यामधून जात आहोत. प्रत्येकजण घाबरायला लागला. मग मुधोळकर सरांना फोन केला. त्यांनी आमच्या सोबतीला एका टेम्पोवाल्याला पाठवले. टेम्पो खूपच संथ गतीने मार्गक्रमण करत होता”

“त्यानंतर वेगात निघालेले अन्य सहकारी भेटले. मी त्यांच्यामध्ये सामील झाले, बीआरएम संपायला वेळ फारच कमी होता. मजल दरमजल करत आम्ही शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. वेळेत बीआरएम संपवल्याबद्दल क्रू मधील सदस्यांनी आमचे अभिनंदन केले. पण इथे आमच्याकडे विश्रांतीसाठी पुरेसा वेळ नव्हता. कालच्या अनुभवा नंतर कोणालाही रात्री सायकल चालविण्याची इच्छा नव्हती. उद्या सकाळी आम्ही सुरु करू शकू असे मुधोळकर यांना सांगितले. ते म्हणाले महाजन सरांशी बोलून तुम्हाला सांगतो. सकाळी 11 वाजता निरोप आला की बीआरएम फ्लॅगऑफ संध्याकाळी 4 वाजता केला जाईल. आता पर्याय नसल्यामुळे सर्वजण 300 बीआरएमसाठी तयार झाले”

“30 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी 300 बीआरएम सुरू झाली. पहिला कंट्रोल पॉईंट हनुमानगड 95 कि.मी अंतरावर होता. फक्त एक ब्रेक घेऊन रात्री 9 वाजता कंट्रोल पॉईंटला पोहोचलो. रात्री साडेआठच्या सुमारास धुक्याची सुरवात झाली. आता 200 किमी अंतर कसे पूर्ण करावे या विचाराने सगळे घाबरून गेले. धुक्यामुळे मुधोळकर यांनी दोन बॅक अप वाहनासह दोन गट केले पण कोणताही गट जास्त वेगवान गतीने सायकल चालवू शकला नाही”

“काहीजण पुढे गेले. काही मागे राहिले. त्यात अल्टो चुकीच्या दिशेने गेली व रस्ता चुकली. आम्ही त्यांच्यासाठी अर्धा तास थांबलो. नंतर मी आणि योगेश सर दोघांनी बरोबरच पुढे जायचे ठरवले. धुक्यामुळे रास्ता समजत नव्हता. वारंवार रस्ता बरोबर असल्याची खात्री करून घेत होतो. चहा ब्रेकसाठी पुन्हा 2 वाजता थांबलो. 200 किमी झाले तरी कंट्रोल पॉईंट पर्यंत पोहोचलो नाही. पहाटेचे 5 वाजून गेले तरी हॉटेल सापडेना. सरांनी अ‍ॅपचे लोकेशन शेअर केले तेव्हा लक्षात आले की आम्ही कंट्रोल पॉईंटच्या दिशेने 21 किमी दूर आहोत. 49 मिनिटात एवढे अंतर कापण्याचे मोठे आव्हान होते. अखेर वेगाने सायकल चालवायचे आणि त्याठिकाणी पोहोचण्याचा निर्णय घेतला आणि सुसाट वेगात निघालो”

“आम्हाला शेवटच्या क्षणी ‘डू नॉट फिनिश’ DNF व्हायचे नव्हते. 39 मिनिटाच्या आत 20 कि.मी. अंतर कसे पार करता येईल हे माहित नव्हते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ठरलेल्या वेळेपर्यंत कसेतरी 200 किमी अंतर पार करून सकाळी 6 वाजायच्या आत आधी आम्हीं ठरलेल्या कंट्रोल पॉइंटला पोहोचलो.  तिथून दुपारी 12 वाजण्याच्या आधी बीआरएम संपवायची होती. खूप दमलो होतो. झोप देखील येत होती, भूक लागली होती. पण वेळ नव्हता. योगेश सरांना सकाळी काही खाण्यासाठी ब्रेक घेण्याची इच्छा होती. त्यानी लहान ब्रेक घेतला पण माझा वेग त्याच्यापेक्षा कमी असल्याने मी न थांबता सायकल चालवत राहिले. त्यामुळे पाणी, अन्न, झोपेशिवाय अंतिम ठिकाणी 30 डिसेंबर रोजी 11 वाजून 29 मिनिटांनी पोहोचू शकलो व ही बीआरएम पूर्ण करणारे आम्ही पहिले होतो”

“प्रचंड इच्छाशक्ती असेल तर अवघड गोष्टही साध्य होऊ शकते याचा प्रत्यय आला. ५ दिवसात १६०० कि.मी. पूर्ण करणारी मी पहिली महिला आहे हे समजल्यावर खूप आनंद व अभिमान वाटला. कोणतीही दुखापत झाल्याशिवाय सर्व अंतर पूर्ण करता येऊ शकले याचे खूप समाधान होते. माझ्या सायकलने देखील चांगली साथ दिली. कोणताही त्रास दिला नाही. आपण शारीरिक व मानसिक रित्या फिट आहे हे परत एकदा सिद्ध झाले. बर्‍याच नवीन सायकल मित्रांशी ओळख झाली , अनेक G8 सायकलस्वारांशी परस्पर संवाद साधला. प्रत्येकाकडून बरेच काही शिकण्यास मिळाले. अशी ही अविस्मरणीय आव्हानात्मक सायकल सफर पूर्ण झाली”

प्रीती मस्के ही आज उत्तम सायकलपटू म्हणून ओळखली जात असली तरीही तिने वयाच्या चाळिशीनंतर सायकल चालविण्यास सुरुवात केली. प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्यानंतर तिने अचानक सायकल चालविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला फक्त आरोग्याची काळजी म्हणून सायकल चालवता चालवता प्रीती कधी सायकलपटू झाली हे तिचे तिलाच समजले नाही. डिसेंबर महिन्यातच तिने काश्मीर ते कन्याकुमारी हा 3800 किमी ची सायकल मोहीम 17 दिवस 17 तासात पूर्ण केली आहे. तिच्या या साहसी वृत्तीला तिच्या कुटुंबीयांची देखील चांगली साथ मिळते. प्रतीचे पती हे देखील ट्रेकर आहेत. प्रीती हिला एक मुलगा आणि मुलगी असून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून प्रीती आपली सायकल चालवण्याची हौस भागवते. नुसती हौस भागवत नसून वेगवेगळ्या सायकल मोहिमेमध्ये यश देखील संपादन करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.