Pune : पुणेकर दरवर्षी 8 दिवस 1 तास अडकतात वाहतूक कोंडीत; जगात वाहतूक कोंडीत पुणे पाचव्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज – सर्वच बाबतीत अव्वल असलेले पुणेकर वाहतूक कोंडीत देखील अव्वल राहिले आहेत. जगातील 57 देशांमधील 416 प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणा-या शहरांच्या यादीत पुणे चक्क पाचव्या क्रमांकावर आहे. पुणेकरांचे वर्षातील 193 तास म्हणजेच 8 दिवस 1 तास वाहतूक कोंडीत जातात.

टॉमटॉम या लोकेशन तंत्रज्ञान कंपनीने जगातील वाहतूक कोंडीचे सर्वेक्षण केले असून त्यांनी त्याबाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या यादीत टॉप टेनमध्ये भारतातील चार आणि त्यातही महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई ही दोन शहरे आहेत. या यादीमध्ये मुंबईचा चौथा तर पुण्याचा पाचवा क्रमांक आहे. जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरात बंगळुरू हे शहर प्रथम स्थानावर आहे.

जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी आयटी हब म्हणून ओळखल्या जाणा-या बंगळुरू शहरात होत आहे. बंगळुरू शहरात 71 टक्के वाहतूक कोंडी आहे. बंगळुरूकर वर्षभरात 243 तास म्हणजेच 10 दिवस 3 तास वाहतूक कोंडीत घालवतात. त्यानंतर भारताच्या आर्थिक राजधानीचा म्हणजेच मुंबईचा क्रमांक लागतो. यादीमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईमध्ये 65 टक्के वाहतूक कोंडी आहे. मुंबईकर 209 तास म्हणजेच 8 दिवस 17 तास दरवर्षी वाहतूक कोंडीमध्ये घालवतात.

पुणे शहर वाहतूक कोंडीमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. पुणेकर दरवर्षी 193 तास म्हणजेच 8 दिवस 1 तास वाहतूक कोंडीमध्ये घालवतात. तर दिल्ली शहर आठव्या क्रमांकावर आहे. दिल्लीकर दरवर्षी 190 तास म्हणजेच 7 दिवस 22 तास वाहतूक कोंडीत घालवतात.

जगात सर्वात कमी वाहतूक कोंडी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मधील ग्रीन्सबोरो हाय पॉईंट या शहरात आहे. इथे केवळ ९ टक्के वाहतूक कोंडी आहे.

वाहतूक कोंडी असलेली जगातील टॉप टेन शहरे

1) बंगळुरू (भारत)
2) मनिला (फिलिपाइन्स)
3) बोगोटा (कोलंबिया)
4) मुंबई (भारत)
5) पुणे (भारत)
6) मॉस्को रिजन (ओब्लास्ट) (रशिया)
7) लिमा (पेरू)
8) नवी दिल्ली (भारत)
9) इस्तंबूल (तुर्की)
10) जकार्ता (इंडोनेशिया)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.