Akurdi : ‘बाहा इंडिया 2020’ स्पर्धेत आकुर्डीचे डी वाय पाटील महाविद्यालय देशात प्रथम

एमपीसी न्यूज- महिंद्रा पुरस्कृत सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएई) बाहा इंडियाची ही 13 वी ‘बाहा इंडिया 2020’ स्पर्धेमध्ये आकुर्डीच्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रेडिएटर्स संघाने एम बी ए जे या वर्गात राष्ट्रीय प्रथम विजेतेपद पटकावले आहे. या सोबतच या संघाने आठ वेगवेगळ्या प्रकारापैकी पाच प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय वढाई यांनी गुरुवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला उपप्राचार्या डॉ.पी. मालती, अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.कुलकर्णी, डॉ. व्यवहारे, शिक्षक समन्वयक सुनील पाटील, तसेच एसएई चे सेक्रेटरी नरहरी वाघ उपस्थित होते. ही स्पर्धा स्पर्धा इंदौरच्या प्रितमपूर येथे आयोजित करण्यात आली होती.

डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय या स्पर्धेत 2009 पासून सहभागी होत आहे. सलग 11 वर्षांच्या प्रयत्नानंतर यावर्षी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. यावर्षी 16 एप्रिल रोजी हा 18 जणांचा संघ अमेरीकेतील ऍरिझोना येथे जाऊन आतंरराष्ट्रीय पातळींवर देशाचे नेतृत्व करणार आहे. या संघात ४ मुली तर १४ मुले आहेत. या संघाचे नेतृत्व साकेत राऊत याने तर उपनेतृत्व अपूर्व महिंद हिने केले. या संघाचा ड्रायव्हर मॅनेजर प्रणव खाटेकर हा होता.

सौरव इंगळे, मृणाल दौंडकर, मृणाल अरगडे, तेजस धाकटे, विशाखा कोटकर, ऋग्वेद बोपर्डीकर, अंशुल गुप्ता, श्रीकांत नखाते, किवीन भोसले, विपुल जाधव, पृथ्वीराज शिंदे, अलीअबू फर्जद, निल कापडी, प्रतिक बिराजदार, वेदांत कुलकर्णी हे विद्यार्थी या संघात होते.

“गेली तीन वर्ष दिवसरात्र मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांनी ही गाडी बनवली आणि स्पर्धेत नेली आणि देशभरातुन आलेल्या नामवंत 120 अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पर्धतून प्रथम क्रमांक पटकावला आहे याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. या मुलांचे भविष्य उज्वल आहे. कारण त्यांचा हा विजय प्लेसमेंटच्यावेळी नक्कीच ग्राह्य धरला जाईल”,असे प्राचार्य डॉ. विजय वढाई म्हणाले.

प्रेडिएटर्स टीमचा ड्रायव्हर मॅनेजर प्रणव खाटेकर म्हणाला,“आम्ही बनवलेली गाडी शेती सारख्या कामात फायद्याची ठरेल. तसेच ही गाडी 2.7 लाख किमतीत बनवता येऊ शकते त्यामुळे हे वाहन बाजारात आल्यास सर्वसामान्यांसाठी किंवा शेतकऱ्यांना परवडणारे असेल”
“आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करु पण आम्हाला सध्या आर्थिक आधाराची गरज आहे”, असे म्हणत संघाचा प्रमुख साकेत राऊत याने आर्थिक मदतीचे आवाहन उपस्थितांना केले. पत्रकार परिषदेनंतर विद्यार्थ्यांनी त्यांनी बनवलेल्या वाहनाबद्दल माहिती दिली आणि वाहन प्रात्यक्षिक करुन दाखवले.

‘बाहा’ म्हणजे नक्की काय ?

बाहाही सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएई) द्वारा संचालित अंतर महाविद्यालयीन डिझाइन स्पर्धा आहे. जगभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचे संघ ऑफ-रोड कार डिझाइन करतात आणि तयार करतात. बी ए एच ए ही अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन अभियांत्रिकी डिझाइन स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी या कार्यक्रमांमध्ये अमेरिका आणि जगभरातील सुमारे 111 बाहा च्या गाड्या दाखल केल्या जातात. जिथे भारत, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि कोरिया यासह कार्यक्रम आयोजित केले जातात. डॉ. हरित मेहता यांच्या देखरेखीखाली बाजा एसएई स्पर्धेची सुरुवात 1976 मध्ये दक्षिण कॅरोलिना विद्यापीठात झाली. पहिल्या दहा शर्यतींमध्ये केवळ 10 संघांनी भाग घेतला. त्या काळापासून, स्पर्धा प्रिमियर अभियांत्रिकी डिझाइनची मालिका बनली आहे. भारतात बाहा 2008 मध्ये सुरू झाले आणि या स्पर्धेत बरीच महाविद्यालये सहभागी झाली. जवळपास 120 अभियांत्रिकी महाविद्यालये या स्पर्धेत भाग घेतात. 2018 पर्यंत पुण्याचे अभियांत्रिकी महाविद्यालय सलग 5 वर्षे या स्पर्धेचा विजेता होते. डी वाई पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी हे ‘बाहा इंडिया 2019’ चा उपविजेता संघ होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.