Nigdi : तीनमजली उड्डाणपुलाचे काम 1 मे पर्यंत पूर्ण करा, महापौरांचे निर्देश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम एक मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच ठेकेदाराने तीन पाळीमध्ये काम करावे. तसेच अधिकाऱ्यांनी नियोजन करून दर 15 दिवसांनी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

निगडीत सुरु असलेल्या तीन मजली पुलाच्या कामाची पदाधिका-यांनी आज (सोमवारी) पाहणी केली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, अमित गावडे, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, शर्मिला बाबर, सह शहर अभियंता श्रीकांत सवने, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उपअभियंता विजय भोजने उपस्थित होते.

भक्ती-शक्ती चौक शहराचे प्रवेशद्वार आहे. पावसाळा, पालखी आगमन, वाहतूक वळण, नागरिकांच्या अडचणीचा विचार करता प्रकल्पाचे काम नियोजनपूर्वक करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या आहेत. दरम्यान, पुलाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण झाले नाही. कामाची मुदत 26 सप्टेंबर 2019 पर्यंतच होती. या कामास वाढीव मुदतवाढ देण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली आहे

ग्रेड सेपरेटरमुळे जोडणारा परिसर, त्याचे फायदे

# ग्रेड सेपरेटरमुळे प्राधिकरण ते मोशी जोडणार
# लांबी 420 मीटर, रुंदी 24 मीटर, उंची 5.50 मीटर
# येणा-या व जाणा-या वाहनांसाठी स्वतंत्र लेन
# पुणे-मुंबई रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे थेट वाहतूक
# प्राधिकरणाकडून पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र पूल
# उड्डाण पुलाखालून बीआरटी बससेवा
# वर्तुळाकार रस्ता
# वाहतूक बेटाचा व्यास 60 मीटर, रुंदी 15.5 मीटर
# रोटरीमुळे पादचा-यांना चौकाच्या कोणत्याही दिशेने ये-जा करणे शक्य
# चौक ‘सिग्नल’फ्री असल्याने पादचारी व वाहनांना थांबावे लागणार नाही
# इंधनामध्ये व वाहनचालकांचे वेळेमध्ये बचत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.