Pune : पुणेकर अनुभवणार भारतीय व युरोपियन मातीची ‘खुशबू’

एमपीसी न्यूज- भारतीय संगीत व युरोपियन ‘जिप्सी’ संगीताचा अनोखा मिलाफ ‘खुशबू’ या नृत्य व संगीताच्या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील ‘अलीऑन्स फ्राँसेज’ व ‘अॅस्टीटयू फ्राँसे’ यांच्या वतीने आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘फ्रेंच’ विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम शनिवार दि. 8 फेबुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एन. एम. वाडिया अॅम्फी थिएटर येथे होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.

राजस्थानच्या मातीचा सुगंध घेऊन पद्मश्री गुलाबो सपेरा यांचे सपेरा समाजातील ‘काल्बेलीया’ हे पारंपरिक लोकनृत्य व लोकगीत, ज्येष्ठ सारंगी वादक मुराद अली खान व फ्रांसचे संगीतकार तिती रोबँ या तिघांचा एकत्र सांगितीक अविष्कार यात बघायला मिळणार आहे. तसेच यावेळी प्रसिद्ध कथक नृत्यांगना महूआ शंकर यांचा नृत्याविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे. यावेळी शुहेब हसन (गायन), डिनो बंजारा (ताल वाद्य), अमान आली खान (तबला) यांची साथसंगत असणार आहे.

‘अलीऑन्स फ्राँसेज’ ही संस्था भारतीय व फ्रेंच यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन परस्परात सलोखा बनून राहावा यासाठी प्रयत्नशील असते. त्यादृष्टीकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. या कार्यक्रमाचे मुंबई, बंगलोर, पुणे, चेन्नई, चंदीगड, दिल्ली असे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.