Akurdi : गृहराज्यमंत्र्यांच्या कॉलेजबाहेर रस्त्यावर व फूटपाथवर पार्किंग, सततच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण

एमपीसी न्यूज – गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या आकुर्डी येथील डॉ. डी. वाय पाटील कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक दररोज सक्तीने ओळखपत्राची तपासणी करत असल्याने प्रवेशद्वाराजवळ वाहनांच्या रांगा लागतात तसेच सुरक्षा रक्षकांचा जाच टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि शिक्षक कॉलेजसमोरील रस्त्यावर व पदपथावर वाहने पार्क करतात. यामुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक व परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या ओळखपत्राची कसून तपासणी केली जाते. ओळखपत्र नसल्यास कॉलेजच्या आवारात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे दररोज सकाळच्या वेळी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी होते. अनेक विद्यार्थी कॉलेजसमोर असलेल्या रस्त्यावर आणि फूटपाथवर वाहने पार्क करतात. यामुळे रहदारीस अडथळा होतो. काहीकाळ वाहतूक कोंडी देखील होते.

कॉलेजसमोरील फूटपाथ हे कॉलेजच्या खासगी वापरासाठी नसून जनतेच्या वापरासाठी आहेत. त्यावर कॉलेजची अरेरावी चालणार नाही. या वाहतूक कोंडीवर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. राज्याचे गृह राज्यमंत्री असणाऱ्या सतेज पाटील यांच्या महाविद्यालयाच्या बाहेर हा प्रकार होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी, ‘परिसरात गस्त घालून वाहतुकीचे नियम तोडणा-या वाहन चालकांवर कारवाई केली जाईल. तसेच कॉलेज व्यवस्थापनाशी चर्चा करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल’, असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.