Wakad : घरातून हाकलून दिल्याच्या रागातून मालकाच्या घरासमोरील तीन वाहने पेटवणाऱ्या भाडेकरूला अटक

एमपीसी न्यूज – घरातून हाकलून दिल्याच्या रागातून भाडेकरुने त्याच्या चार साथीदारांसोबत येऊन मालकाच्या घरासमोर पार्क केलेली तीन वाहने पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच मालकाच्या गळ्यावर लोखंडी कोयता लावून जबरदस्तीने चोरी करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) दुपारी बाराच्या सुमारास विजयनगर काळेवाडी येथे घडला. पोलिसांनी भाडेकरूला अटक केली आहे.

विजय सिद्धार्थ म्हस्के (वय 19, रा. काळेवाडी, वाकड) असे अटक केलेल्या भाडेकरूचे नाव आहे. त्याच्यासह निरंजन सहारा, शुभम कसबे, संकेत चौधरी, एक अनोळखी मित्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बाबासाहेब प्रभाकर पानढवळे (वय 49, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय फिर्यादी यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होता. त्याला फिर्यादी पानढवळे यांनी एक वर्षांपूर्वी घरातून काढून टाकले होते. त्याचा राग मनात धरून विजय त्याच्या चार साथीदारांना घेऊन मंगळवारी दुपारी पानढवळे यांच्या घरी आला. त्याने पानढवळे यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या तीन दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्या.

पानढवळे यांनी विजयला अडवण्याचा प्रयत्न केला असता विजय आणि त्याच्या चार साथीदारांनी पानढवळे यांच्या गळयावर लोखंडी कोयता ठेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. पानढवळे यांच्या शर्टच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर पानढवळे यांच्या मोठ्या भावाला व भाडेकरू सदाशिव हिरेमठ यांना देखील जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी विजयला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.