Shirur : खासदार डॉ अमोल कोल्हे आयोजित श्रवणदोष तपासणी शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत श्रवणदोष तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हडपसर येथे हे शिबिर पार पडले.

या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोनिका हरगुडे, रवीबापू काळे, पंडित दरेकर आदी उपस्थित होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या वर्षात एक अभिनव उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवणदोष तपासणी करण्यात आली. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुमारे 301 ज्येष्ठ नागरिकांच्या कानांची तपासणी करण्यात आली. अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींना डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.

स्टार्की फाऊंडेशन अमेरिका या संस्थेच्या वतीने डॉ. रवी गुप्ता, डॉ. सागर कानेकर,डॉ. पी. व्ही सरथ ,डॉ. निहार प्रधान, डॉ. यशवंत सिंह, डॉ. सुरजित पेन, डॉ. स्टेजीन बेनी आदींनी कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशा सेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.