Pimpri : शौचालय, स्वच्छतागृहांची दिवसातून चार वेळा होणार स्वच्छता

'व्हीटीएस' यंत्रणेद्वारे राहणार लक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 आणि 19 मधील 120 शौचालय इमारती आणि 42 स्वच्छतागृहांच्या (मुतारी) इमारतींची दिवसातून चार वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छता ‘जेट’ मशिनद्वारे स्वच्छता करण्यात येणार असून ‘व्हीटीएस’ यंत्रणेद्वारे त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या शौचालय, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचे काम दोन स्वयंसेवी संस्थाना एक वर्षासाठी देण्यात आले असून त्यासाठी महापालिका तीन कोटी 79 लाख 39 हजार 488 रुपये मोजणार आहे.

महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 10 आणि 19 मधील शौचालय आणि स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी निविदा काढण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 10 मधील 434 सार्वजनिक शौचालये आणि 92 स्वच्छतागृहांसाठी 2 कोटी 27 लाख 48 हजार 732 रुपयांची निविदा काढण्यात आली. त्यासाठी श्री बापदेव महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची 1 कोटी 86 लाख 53 लाख 957 रुपये एवढी निविदा प्राप्त झाली. ही निविदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा 18 टक्क्यांनी कमी असल्याने या संस्थेला हे काम देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.

तर, प्रभाग क्रमांक 19 मधील 586 शौचालये आणि 28 मुतारींसाठी 2 कोटी 29 लाख 86 हजार 332 एवढी अंदाजपत्रकीय निविदा काढण्यात आली होती. त्यासाठी मे. शुभम उद्योग यांची 1 कोटी 92 लाख 85 हजार 531 रुपये एवढी लघुत्तम निविदा प्राप्त झाली. अंदाजपत्रकीय निविदेपेक्षा ही निविदा 16.10 टकक्यांनी कमी असल्याने स्थायी समितीने हे काम मे. शुभम उद्दोग यांना देण्यास मंजुरी दिली.

दरम्यान, या संस्थांनी दिवसातून चार वेळा शौचालये आणि स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे बंधनकारक आहे. पाण्याची कमतरता भासत असल्याने अनेकदा स्वच्छतेचे काम होत नाही. त्यामुळे या पुढे स्वच्छतेचे काम जेट मशिनद्वारे करण्यात यावे. तसेच दोन्ही प्रभागांमधील 120 शौचालय इमारती आणि 42 स्वच्छतागृहांच्या इमारतींच्या दर्शनी भागात संबंधित संस्थेचे नाव, संपर्कासाठी टेलिफोन तसेच मोबाईल क्रमांक, संबंधित आरोग्य निरीक्षक , मुख्य आरोग्य निरीक्षक यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक असणारे फलक लावणे बंधणकारक आहे. त्याचप्रमाणे शौचालये आणि स्वच्छतागृहे यांची स्वच्छता होते की नाही याची पडताळणी करण्यासाठी महापालिकेतर्फे सस्थेच्या वाहनांवर व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

या यंत्रणेमुळे संबंधित संस्थेने कोणकोणत्या ठिकाणी जाऊन स्वच्छतेचे काम केले आहे, हे समजणार आहे. त्यानंतर या यंत्रणेचा रिपोर्ट आरोग्य निरीक्षक व मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्याकडून प्रमाणीत करून संस्थेने दर महिन्याच्या बिलात जोडायचे आहे. त्यानंतर संबंधित संस्थेचे बील मंजूर करण्यात येईल, अशी उपसूचना स्थायी समितीने दिली आहे.

याबाबत बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, ”प्रभाग क्रमांक 10 आणि 19 मधील सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छतागृहे यांची दिवसातून चार वेळा स्वच्छता होणार आहे. शौचालये आणि स्वच्छतागृहे यांची योग्य पद्धतीने स्वच्छता व्हावी. नागरिकांना काही तक्रारी असतील तर त्यांन त्या करता याव्यात, स्वच्छता होते की नाही, यावर लक्ष रहावे यासाठी व्हीटीस यंत्रणा, जेट मशिन तसेच इमारतींवर संस्था, अधिकाऱ्यांचे नाव, मोबाइल क्रमांकाचे बोर्ड लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.