Alandi : ‘मंत्री तुम्ही आहात, मी नाही !… तरीसुद्धा उपमुख्यमंत्र्यांना सांगतो’ शरद पवार यांचे मिश्किल उत्तर

इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या मागणीवर आठ दिवसात बैठक बोलावण्याचे आश्वासन

एमपीसी न्यूज – आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात वारक-यांनी इंद्रायणीनदी स्वच्छ करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली. त्यावेळी ‘मंत्री तुम्ही आहात, मी नाही !’ अशी कोपरखळी दिलीप वळसे पाटील यांना मारत ‘इंद्रायणी स्वच्छतेची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. ते उपमुख्यमंत्री आहेत … त्यांच्याशी बोलतो… बघू काय म्हणतात ते……. उपमुख्यमंत्री आहेत ते’ अशी मिश्किल टिपण्णी शरद पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

शरद पवार म्हणाले, ” वळसे साहेबांनी मला या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. मला कधी कधी गमंत वाटते. मी मंत्री नाही आता. तुम्ही लोक मंत्री आहात. त्यामुळे माझ्या हातात काही नाही. पण ठीक आहे. इंद्रायणी स्वच्छतेची मागणी वारक-यांची आहे. वारकरी स्वत:साठी काही मागत नाहीत. नदी स्वच्छ, पवित्र, शुद्ध राहिली तर सर्व समाजाला ती उपयुक्त पडणार आहे. समाजाच्या संबंधीची वारकरी मागणी करत आहेत. स्वत:साठी काही मागणी करत नाहीत. जो स्वत:साठी मागणी करत नाहीत. समाजासाठी मागणी करतात.त्यांच्या मागे सरकारने उभे राहिले नाही. तर, ते सरकार पाहिजे कशाला ?”

” हे काम पाटबंधारे मंत्र्यांकडे असेल असा माझा समज आहे. त्यांच्याकडे असेल तर जयंतराव पाटील पाटबंधारे मंत्री आहेत. त्यांना सांगू आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी जास्त आहे. त्यांच्याही कानावर घालू, बघू या काय म्हणतात ते, उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही म्हणतात तर मी सांगतो त्यांना”

“इंद्रायणी स्वच्छ व्हावी ही समाजाची अपेक्षा आहे आणि तिची पूर्तता करणे ही पवार घराण्यात जन्मलेल्याची जबाबदारी आहे. एवढं सांगितल्यावर पुरे होईल असे वाटते. काही काळजी करु नका. येत्या आठ दिवसात सर्वांची बैठक घेऊन एवढं झाले पाहिजे असे सांगतो” असे पवार म्हणाले.

” हे आश्वासन नाही. मी आश्वासन देण्यासाठी उभा राहिलो नाही. हे कर्तव्य आहे. कर्तव्याची पूर्तता करण्याची जबाबदारी सत्तेत असो अथवा नसो, मी करतो. गेली 52 वर्ष महाराष्ट्रातील जनतेने मला आशीर्वाद दिले आहेत. आज मी संसदेत आहे. सतत 52 वर्ष 14 वेळेला निवडून येणारा एकमेव सभासद तुमच्या महाराष्ट्रातील आहे. आता आणखीन काय द्यायचे लोकांनी आपल्याला ? चारवेळेला मुख्यमंत्री केले. देशाचे संरक्षणमंत्री केले. दहा वर्ष शेतीमंत्री केले. आता इतके ज्यांनी दिले. त्यांनी एवढसे सांगितले. तर, त्यांना का थांबवायचे ?” असे भावनिक उत्तर शरद पवार यांनी दिले.

“आळंदीच्या नगराध्यक्षा, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तुम्ही सगळ्यांनी येत्या आठ ते दहा दिवसात मुंबईला माझ्याकडे यावे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील या सगळ्यांना एकत्र करतो. एवढं झाले पाहिजे. हे सांगतो. आणि माझी खात्री आहे. ते होईल. इंद्रायणी शुद्ध करण्याची मागणी मला भावलेली आहे. ती पूर्ण झाली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले. तसेच दर्शनबारीसाठी जे काही करायचे आहे. ते देखील केले जाईल असेही पवार यांनी आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.