Moshi : ‘हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षांना मारहाण प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद’

चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अपर पोलीस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – सोसायटीचे स्टिकर वाहनांवर लावण्यावरून सोसायटीत राहणा-या दोन तरुणांनी त्यांच्या 15 साथीदारांना बोलावून सोसायटीच्या अध्यक्षांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अन्य आरोपींना अटक करण्यात पोलीस गय करीत असून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे निवेदन चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने अपर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

सोसायटीमधील वाहनांवर स्टिकर लावणे बंधनकारक केल्याचा ठराव सोसायटीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, स्टिकर लावण्याची कारवाई करत असताना एका तरुणाला स्टिकर लावण्यासाठी सांगितले असता त्याने त्याच्या भावाला व दहा ते पंधरा साथीदारांना बोलावून स्टिकर लावण्याची विनंती करणा-या सोसायटीच्या अध्यक्षांना बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. 2) रात्री सव्वाआठ वाजता इंदूबन रेसिडेन्सी गेटवर दिघी रोड भोसरी येथे घडला. याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष सचिन सुभाष सूर्यवंशी (वय 41, रा. इंदुबन रेसिडेन्सी, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करीत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदूबन सोसायटीचे अध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करत असताना दोन पोलीस कर्मचारी सोसायटीच्या गेटवर होते. त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी कोणतीही तसदी घेतली नाही. पोलिसांसमोर सर्व आरोपी पळून गेले. दुस-या दिवशी सोसायटीतील सर्व रहिवासी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर एकाला अटक केली. तर त्यानंतर घटनेतील दुसरा आरोपी घरी आल्याचे सोसायटीतील नागरिकांना दिसल्यावर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दुस-या आरोपीला अटक केली आहे.

फिर्यादी सूर्यवंशी त्यांच्या सोसायटीच्या गेटवर थांबून सोसायटीमधील सर्व वाहनांवर स्टिकर लावला आहे की नाही ते तपासात होते. त्यावेळी सोसायटीतील मिश्रा यांचा मुलगा विना स्टिकरची गाडी सोसायटीमध्ये घेऊन आला. त्याला स्टिकर लावण्याची विनंती केली असता त्याने त्याच्या भावाला व 15 साथीदारांना बोलावून सूर्यवंशी यांना पट्ट्याने बेदम मारहाण केली. यामध्ये सूर्यवंशी यांच्या डोक्यात व डोळ्यास इजा झाली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत. पोलिसांनी अन्य आरोपींना देखील अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.