Pimpri : शाळांच्या सफाईसाठी सव्वाकोटीचा वाढीव खर्च; स्थायी समिती समोर प्रस्ताव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 प्राथमिक, 18 माध्यमिक शाळा तसेच दोन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील (आयटीआय) वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची 186 सफाई कर्मचा-यांमार्फत यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यात येते. मात्र, शाळांनी केलेल्या मागणीनुसार, आता आणखी 42 सफाई कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी सव्वाकोटी रूपये वाढीव खर्च होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर दाखल करून घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या 105 प्राथमिक, 18 माध्यमिक शाळा आहेत. तसेच दोन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) आहे. महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या 104 इमारती आहेत. 105 प्राथमिक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची संख्या 1 हजार 121 आहे. तर, 750 शौचालये आणि 1 हजार 140 स्वच्छतागृहे आहेत. माध्यमिक विभागाच्या 18 शाळांमध्ये वर्ग खोल्यांची संख्या 243 आहे. तर, 207 शौचालये आणि 256 स्वच्छतागृहे आहेत. तसेच दोन आयटीआयच्या वर्ग खोल्यांची संख्या 41 आहे. तर, 9 शौचालये आणि 9 स्वच्छतागृहे आहेत.

या शाळा आणि आयटीआयच्या इमारती, वर्गखोल्या, परिसराची साफसफाई करण्यासाठी एकूण 186 सफाई कामगार आहेत. तसेच या इमारतीतील शौचालय आणि स्वच्छतागृहांची स्वच्छता ही यांत्रिक पद्धतीने करण्यात येते. त्यासाठी दोन याप्रमाणे एकूण 46 सफाई कामगार असणार आहेत. महापालिका आठ क्षेत्रीय कार्यालयानुसार आठ सुपरवायझर नियुक्त आहेत. या कामासाठी दोन वर्षे कालावधीकरिता ब्रिक्स इंडिया यांची ठेकेदार म्हणून 28 फेब्रुवारी 2019 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे कामकाज 1 ऑगस्ट 2019 पासून सुरू झाले आहे.

प्रत्येक शाळेतील 12 वर्गखोल्या साफसफाई करण्यासाठी 1 सफाई कामगार असे नियोजन आहे. तथापि, कामकाज चालू झाल्यापासून बहुतेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सफाई कर्मचारी अपुरे असल्याबाबत लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत, याबाबत ब्रिक्स इंडियाने महापालिकेला कळविले होते. करारनाम्यात शाळांच्या इमारतींची संख्या वाढल्यास अथवा मागणी असल्यास मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल, असे नमूद आहे.

आयटीआय आणि शिक्षण विभागाने 28 नोव्हेंबर 2019 रोजी पत्राद्वारे आकांक्षा फाऊंडेशन आणि शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणा-या शाळांमध्येही सफाई कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे कळविले. त्यामुळे सर्वच शाळांना सफाई कर्मचा-यांच्या मागणीची माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार, माध्यमिक विद्यालयांनी सहा, शिक्षण विभागाने याआधी समाविष्ट न केलेल्या पाच, आकांक्षा फाऊंडेशन आणि शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणा-या शाळेमध्ये वाढीव पाच आणि आयटीआय मोरवाडी येथे एक अशा एकूण 12 कर्मचा-यांची वाढीव मागणी करण्यात आली. त्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 24 जानेवारी 2020 रोजी मान्यता दिली.

तथापि, शिक्षण विभागाने चिखलीतील शाळेसाठी कर्मचारी वाढवून मिळण्याची मागणी केली. या नवीन मागणीनुसार, प्राथमिक शाळांकरिता 30, माध्यमिक शाळांकरिता 11, आयटीआय मोरवाडी येथे एक अशा एकूण 42 कर्मचा-यांची वाढीव मागणी केली. त्यानुसार, ब्रिक्स इंडिया या संस्थेस वाढीव 42 सफाई कामगार मार्च 2020 पासून मूळ कामाची मुदत संपेपर्यंत म्हणजेच ऑगस्ट 2021 पर्यंत पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी 1 कोटी 22 लाख 44 हजार रूपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.