Pune : ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’तर्फे 23 फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन

'पेठ ग्रुप' करणार नेतृत्व ; 19 फेब्रुवारी नोंदणी अंतिम दिनांक

एमपीसी न्यूज- ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’ ही भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. सामाजिक स्तरावर पुणे रनिंगच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. संस्थेअंतर्गत ‘लास्ट संडे ऑफ मंथ’ (LSoM) च्या वतीने महिन्यातील शेवटच्या रविवारी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. रविवारी (दि. 23) ही मॅरेथॉन रमणबाग शाळा, शनिवार पेठ येथून सुरु होईल. अशी माहिती सुधिंद्र हरिभट (पुणे रनिंग, अध्यक्ष) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

ही मॅरेथॉन ‘वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर’ या संकल्पनेवर आधारित आहे. 3 किमी , 5 किमी, आणि 10 किमी अंतरासाठी हे मॅरेथॉन होणार असून यामध्ये सुमारे 1500 ते 1800 जण सहभागी होतील. प्रत्येक महिन्यातील मॅरेथानसाठी वेगवेगळा धावणारा गट पुढाकार घेत असतो. या मॅरेथॉनचे ‘पेठ ग्रुप’ नेतृत्व करेल. सरिता राठी ‘पेठ ग्रुप’ च्या गटनेत्या असणार आहेत.

या मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी lsom.in या लिंकवर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य आहे. 19 फेब्रुवारी हा नोंदणीसाठी अंतिम दिनांक आहे. शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत अथवा रविवारी फ्लॅग ऑफ होण्याच्या एक तास अगोदर ‘बिब’ चे वितरण रमणबाग शाळेत करण्यात येईल. फ्लॅग ऑफची वेळ १० किमी साठी सकाळी पावणेसहा वाजता राहील तर 5 किमी आणि 5 किमीसाठी सकाळी सव्वासहा वाजता फ्लॅग ऑफ होईल.

जनार्दन रणदिवे (अध्यक्ष, पुणे पीपल्स को-ऑप बँक), तृतीयपंथी संतोषी कदम आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुजा वाघोलीकर व अनुराधा वाघोलीकर यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक पुणे पीपल्स को-ऑप बँक लि. असून, मीडिया पार्टनर 95 बिग एफएम आहे, अशी माहिती मिलिंद वाणी यांनी दिली.

‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’ वर्षभरात विविध सामाजिक सत्रांचे आयोजन करते. यामध्ये धावणे, योग, स्ट्रेंथ ट्रेनींग यांचा समावेश आहे. ही सर्व सत्रे विनामूल्य असतात. देशातील विविध शहरांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविले जाऊ लागले आहेत.

पुणे येथील ‘अ‍ॅपलॉड’ ही स्वयंसेवी संस्था तृतीयपंथीयांना सक्षम करणे, प्रेरणा देणे आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत करणे यासाठी कार्यरत आहे. ‘पुणे रनिंग’ च्या या मॅरेथॉनच्या संकल्पनेमुळे ‘तृतीयपंथीबद्दल भेदभाव करण्याऐवजी त्यांना सामाजिकरित्या स्वीकारू या आणि त्यांनाही आपल्या समाजाचा भाग बनवू’ असा संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे, असे अनुजा वाघोलीकर आणि अनुराधा वाघोलीकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला सुधींद्र हरिभट (अध्यक्ष, ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’), सरिता राठी ( LSoM, पेठ गट नेता), मिलिंद वाणी (अध्यक्ष, LSoM मॅरेथॉन), जनार्दन रणदिवे (अध्यक्ष, पुणे पीपल्स को-ऑप बँक), ‘अ‍ॅपलॉड’ एनजीओ ( तृतीयपंथीयांच्या समस्या निराकरणसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था) च्या अनुजा वाघोलीकर आणि अनुराधा वाघोलीकर तसेच तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी यांच्या समवेत तृतीयपंथी संतोषी कदम उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.