Pune : शिवभोजन थाळ्यांच्या संख्येत वाढ ; आता रोज 1500 थाळ्या

एमपीसी न्यूज- गरीब जनतेला अल्पदरात भोजन मिळावे या उद्देशाने देण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारने प्रजासत्ताक दिनापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून 11 ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या योजनेला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता राज्य सरकारने शिवभोजन थाळ्यांच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार पुण्यात सात ठिकाणी एक हजार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चार ठिकाणी पाचशे अशा एकूण 1500 थाळ्या पुण्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. सध्या साडेअकराशे थाळ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश राज्य सरकारने मंगळवारी जारी केले.

या योजनेच्या उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात मार्केट यार्ड केंद्रावर जेवणासाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे पुण्यातील केंद्रांच्या संख्येत आणि त्यातील थाळ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. पुण्यात एक हजार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाचशे अशी एकूण प्रतिदिन 1500 थाळ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातील सात केंद्रांवर प्रत्येकी 143 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चार केंद्रांवर प्रत्येकी 125 थाळ्या मिळणार आहेत.

पुण्यात पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा, कौटुंबिक न्यायालय, कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह, स्वारगेट एसटी स्थानक, गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील समाधान गाळा क्र. 11, महात्मा फुले मंडई, हडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय येथे आणि पिंपरी-चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपाहारगृह, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, वल्लभनगर बसस्थानक, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण येथे शिवभोजन थाळी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.