Pimpri: ‘निओ मेट्रो’ मृगजळ ठरण्याची चिन्हे, घर बचाव संघर्ष समिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वर्तुळाकार (एचसीएमटीआर) मार्गाबाबत न्यायालयाचा अंतिम निर्णय बाकी आहे. त्यामुळे या मार्गावर निओ मेट्रो राबविता येईल का? असा सवाल उपस्थित करत “निओ मेट्रो” मृगजळ ठरण्याचीच शक्यता असल्याचे घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी म्हटले आहे.

वाहतूक सक्षमीकरणाकरिता बीआरटी, मेट्रो व एचसीएमटीआर रिंगरोड जोडणार आहेत. नियो मेट्रो सुरु केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्पात सांगितले आहे. त्यावर घर बचाव संघर्ष समितीचे विजय पाटील म्हणाले, “एचसीएमटीआरला राज्य सरकारची मान्यता नाही. विकास आराखड्यात देखील एचसीएमटीआरला मान्यता नाही. असे असतानाही आयुक्तांनी वेळोवेळी एचसीएमटीआरच्या नावाखाली 50 कोटींची उधळपट्टी केली आहे. मागील दोन वर्षात एचसीएमटीआरचा 1.6 किलोमीटरचा रस्ता महापालिका बनवू शकली नाही. तर येत्या काही वर्षात 30 किलोमीटरचा निओ मेट्रो प्रकल्प एचसीएमटीआरच्या जागेवर कोणत्या पद्धतीने बनविणार हा मोठा यक्षप्रश्न आहे.

गेल्या तीन वर्षांपासून एचसीएमटीआर विरोधात बाधित राहिवाशांनी तीव्र आंदोलन केले. अजूनही तो विरोध कायम आहे. यासंदर्भात महापालिका, राज्यशासन व प्राधिकरणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. तसेच रहाटणी परिसरात काळेवाडी फाटा ते कोकणे चौक भागात स्थगितीचा आदेश आहे. असे असताना निओ मेट्रो बाबत आयुक्तांनी सखोल अभ्यास न करता निव्वळ कोणाच्या तरी दबावाखाली अर्थसंकल्पात एचसीएमटीआरला कोट्यवधींची तरतूद केलेली दिसून येत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.