Talegaon Dabhade : शिवजयंती निमित्त काढलेल्या ‘चित्ररथ महारॅली’ने शहरवासीयांच्या डोळ्याचे फेडले पारणे

एमपीसी न्यूज- शिवजयंती निमित्त बुधवारी (दि. 19) काढण्यात आलेल्या ‘चित्ररथ महारॅली’ने शहरवासीयांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या रॅलीत सुमारे 10 हजार विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते. नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या संयुक्त ‘शिवजयंती ते भीमजयंती महोत्सवा’ अंतर्गत काढण्यात आलेल्या रॅलीत प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीतील मुलांनी 27 आकर्षक चित्ररथ सादर केले.

तळेगाव स्टेशन येथील एसटी बसस्थानक परिसरात बुधवारी (ता. 19) सकाळी रथयात्रेला मोठ्या थाटात आणि ढोलताशांच्या गजरात सुरुवात झाली.नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,माजी नगराध्यक्षा श्रीमंत अंजलीराजे दाभाडे,सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वीरेंद्रकुमार टोपो,मुख्याधिकारी दीपक झिंजाड,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे,शिक्षण,क्रिडा समितीचे सभापती तथा महोत्सवाचे संयोजक गणेश खांडगे, उद्योजक किशोर आवारे तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन रथयात्रेला सुरुवात झाली.

रथयात्रेच्या अग्रभागी सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांनी शिवजन्म सोहळा, शिवबाला गोष्ट सांगताना माता जिजाऊ,बालसवंगड्यांसोबत शिवाजी, सोन्याचा नांगर, स्वराज्याची प्रतिज्ञा, रांझ्याचा पाटील, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, भक्ती शक्ती, गड आला पण सिंह गेला, लोकसंस्कृती, शिवराज्याभिषेक सोहळा, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आत्मचरित्र, डॉ. आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज भेट, डॉ. बाबासाहेबांचे तळेगावातील वास्तव्य, संविधान – स्वराज्य यामधील समान धागे यांच्यासह महापुषांचे तसेच ऐतिहासिक घटनांचे जिवंत देखावे रथांवर सादर केले.

विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करत हातात भगवे – निळे झेंडे घेऊन ‘जय शिवराय जय भीमराय’ अशा घोषणा दिल्या.या रॅलीत ढोल लेझीम पथके,विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅलीची सांगता थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात झाली.

यावेळी आमदार सुनील शेळके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे ,शिक्षण समितीचे सभापती गणेश खांडगे
यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी प्रशासन अधिकारी संपतराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक सुशील सैंदाणे, गणेश काकडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी सभागृह नेते अमोल शेटे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, सुरेश दाभाडे,रवींद्र आवारे, नगरसेविका शोभा भेगडे, संध्या भेगडे, मंगल जाधव, विभावरी दाभाडे, काजल गटे, प्राची हेंद्रे यांच्यासह नगरपरिषदेतील विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक सुरेश दाभाडे यांनी शिवरायांच्या जीवनचरित्रावर माहिती सांगितली व अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.