Maval : लोहगड महाशिवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज- लोहगड महाशिवरात्र उत्सव समिती व लोहगड घेरवाडी ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात येणाऱ्या महाशिवरात्र उत्सवाची लोहगड किल्ल्यावर जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लोहगड किल्ल्यावर त्र्यंबक महादेवाचे शिवकालीन मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्री निमित्त शिवभक्त येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.

मावळ मधील किल्ले लोहगडावर पुरातन त्र्यंबक महादेवाचे मंदिर आहे.या मंदिरात महाशिवरात्री निमित्त दरवर्षी येथे भव्य यात्रा भरत असते. लोहगड महाशिवरात्र उत्सव समिती व लोहगड घेरवाडी ग्रामस्थांच्या वतीने ही यात्रा भरवली जाते. त्र्यंबक महादेवाचे हे शिवकालीन मंदिर असून महाशिवरात्रीसाठी येथे शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.लोहगडावर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू असून या वेळी मंदिराची साफसफाई आणि आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली.

शिवकालीन गड सजावट व भव्य पालखी मिरवणूक हे यावर्षीच्या महाशिवरात्रीचे मुख्य आकर्षण असणार आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आज, गुरुवारी (दि 20) सायंकाळी गड पायथ्याशी असणाऱ्या शिवस्मारकावर दीपोत्सव करण्यात येणार आहे. महाशिवरात्र उत्सव सकाळी सात वाजता त्र्यंबक महादेव मंदिरात महाअभिषेकाने सुरु होईल व सकाळी 9 वाजता लोहगड गावातून शिवपालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सकाळी 10 वाजता शिवस्मारकावर शिववंदना घेऊन पुष्पवृष्टी करण्यात येईल तर 11 वाजता इतिहास अभ्यासक ओंकार वर्तले यांचे लोहगडावर शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती लोहगड महाशिवरात्र उत्सव समितीचे समन्वयक सचिन टेकवडे यांनी दिली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.