Chinchwad : आयुक्तालय हद्दीतील 112 शिवमंदिरांजवळ पोलिसांचा खडा पहारा

पाच ठिकाणी विशेष लक्ष तर 12 मंदिरांमध्ये अतिरिक्त फौजफाटा

एमपीसी न्यूज – महाशिवरात्रीचा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज झाले आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या 112 शिवमंदिरांवर पोलिसांची करडी नजर आहे. आयुक्तालयात 12 शिवमंदिरांमध्ये सर्वाधिक गर्दी होते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच ठिकाणे कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने महत्वाची मानली जातात. त्यामुळे पोलीस सर्व ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.

तळेगाव येथील घोराडेश्वर, चिंचवड येथील धनेश्वर, पिंपरीतील तपोवन, चाकण येथील चक्रेश्वर आणि निगडीतील निळकंठेश्वर ही मंदिरे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची आहेत. त्यानुसार या मंदिर परिसरात एक दिवस अगोदरच पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात आहेत. महिलांची छेडछाड, दागिने हिसकावणे, पाकीटमारी आदी गैर प्रकारांवर ते लक्ष ठेवून आहेत. असे काही प्रकार आढळ्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त पोलिसांनी मंदिरांच्या विश्वस्तांना परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्त्री – पुरुष याच्या वेगळ्या रांगा करणे यासह खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. उत्सवाला कोठेही गालबोट लागू नये यासाठी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. याशिवाय उपायुक्त विनायक ढाकणे, स्मिता पाटील, सुधीर हिरेमठ यांच्यासह 5 सहायक आयुक्त, 41 पोलीस निरीक्षक, 98 सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक, 700 पोलीस कर्मचारी, राखीव दलाच्या 6 तुकड्या आणि 250 होमगार्ड तैनात आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरावडेश्वर मंदिरात भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होते. याठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन दिवस अगोदरच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, समाजकंटक देशविघातक कृत्य करण्याची शक्यता गृहीत धरून यंदा बॉम्ब शोधक नाशक पथकाचेही पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस व बॉम्ब शोधक नाशक पथकाने घोरावडेश्वर डोंगर परिसर पिजून काढला असून गैरप्रकार आढळून आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शिवमंदिरे

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 112 शिवमंदिरे आहेत. शिव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 18 शिवमंदिरे आहेत. तर शिवमंदिरे आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात कमी म्हणजे 2 शिवमंदिरे आहेत. त्याचबरोबर चिंचवड (8), निगडी (11), भोसरी (7), एमआयडीसी भोसरी (5), दिघी (5), चाकण (3), सांगवी (7), वाकड (12), हिंजवडी (12), देहूरोड (5), तळेगाव दाभाडे (5), तळेगाव एमआयडीसी (6), चिखली (6) पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाशिवरात्रीचा जागर करणारी मंदिरे आहेत.

सर्वाधिक गर्दी असणारी शिव मंदिरे

# चिंचवड- धनेश्वर मंदिर
# निगडी (ज्ञानेश्वर उद्याना जवळ) – बेलेश्वर मंदिर
# निगडी (प्राधिकरण सेक्टर क्रमांक 24) – निळकंठेश्वर मंदिर
# मोशी – नागेश्वर मंदिर
# आळंदी – सिद्धेश्वर मंदिर
# चऱ्होली – वाघेश्वर मंदिर
# चाकण- चक्रेश्वर मंदिर
# चाकण – कुंडेश्वर मंदिर
# तळेगाव दाभाडे – घोरावडेश्वर मंदिर (टेकडी वरील)
# तळेगाव दाभाडे – घोरावडेश्वर (पायथा मंदिर)
# तळेगाव एमआयडीसी – भोलेश्वर मंदिर
# पिंपळे सौदागर- महादेव मंदिर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.