Pune : एका पुणेकराने सिंहगडावर केले माउंट एव्हरेस्ट शिखर सर !

एमपीसी न्यूज- पुण्यातील एका व्यक्तीने चक्क जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर सिंहगडावर सर केले. थांबा ! चक्रावून जाऊ नका ! पुण्यातील आशिष कासोदेकर यांनी ‘एव्हरेस्टिंग’ या आपल्या उपक्रमात सलग 32 तास 30 मिनिटांमध्ये 16 वेळा सिंहगड चढून  8994 मीटर उंची गाठली आणि माउंट एव्हरेस्टची 8848 मीटरची उंची पूर्ण केली.  गुरुवारी (दि. 20) दुपारी 2 वाजता सुरु केलेला उपक्रम शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजता समाप्त झाला.

एव्हरेस्टींग म्हणजे 8848 मीटर ही एव्हरेस्टची उंची नाॅन स्टॅाप चढणे. सिंहगडची उंची 563 मीटर आहे. त्या हिशोबाने आशिष यांनी 16 वेळा सलग घाट रस्त्याने चालत तर कधी पळत जाऊन 8994 मीटर उंची गाठली आणि माउंट एव्हरेस्टची 8848 मीटरची उंची पूर्ण केली. यावेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने हजर होते. असा विक्रम करणारे आशिष हे महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. या उपक्रमात आशिष यांना त्यांचे मित्र हरी दांपत्ती, मंगेश शिंदे, कौस्तुभ वर्तक आणि इतर यांनी मोलाची साथ दिली.

काहीतरी जगावेगळे करण्याचा छंद असलेले आशिष कासोदेकर यांची ‘एज ओव्हर हॉलिडेज’ नावाची ट्रॅव्हल कंपनी आहे. कासोदेकर यांनी यापूर्वी 11 नोव्हेंबर 2011 मध्ये 22 तासात सायकलवरून पुणे- गोवा अंतर पूर्ण केले. 12 डिसेंबर 2012 रोजी पुणे ते पाचगणी अंतर 22 तासात चालत पूर्ण केले आहे. तर 13 डिसेंबर 2013 मध्ये बाईकवर नाॅनस्टाॅप 2400 किमी अंतर पार केले आहे. त्याशिवाय लडाख येथे 555 किलोमीटर अल्ट्रा मॅराथॉन पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like