Pune : विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांची अनवाणी पुणे ते मुंबई पायी आत्मक्लेश यात्रा

एमपीसी न्यूज – राज्यातील विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून आपल्या मागण्यांसाठी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे ते मंत्रालय मुंबई या मार्गावर आत्मक्लेश यात्रेचे आयोजन केले आहे. आत्मक्लेश यात्रेतील सहभागी शिक्षक अनवाणी पायाने पुणे ते मुंबई चालत जाणार आहेत. या यात्रेला आज (मंगळवारी) शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथून प्रारंभ झाला आहे.

यावेळी राज्य अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज, राज्य संघटक पुंडलिक रहाटे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सुनील कल्याणी, राज्य सचिव प्रकाश पाटील, अमित प्रसाद, प्रविण पारसे, रवींद्र तम्मेवार, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैजनाथ चाटे, सातारा अध्यक्ष प्रेमकुमार बिंदगे, रजनी कुंभार, विश्वनाथ मुंडे, आदी उपस्थित होते.

‘पाऊले चालती, प्रचलित अनुदानाची वाट’ असे म्हणत या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. विनाअनुदानित शाळांना 20 टक्के वाढ देण्यापेक्षा प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, सेवा संरक्षण मिळावे, अघोषित शाळा निधीसह घोषित कराव्यात या तीन प्रमुख मागण्यांसाठी ही आत्मक्लेश यात्रा काढली जात आहे. राज्यभरातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षक श्वासागणिक मरणाकडे ओढला जात आहे. राजकीय मंडळींना सत्तेच्या बेरजेतून उसंत मिळत नाही. विनाअनुदानित शाळेत शिक्षकांच्या भविष्याचा विचार करण्याबाबत शासनाला सांगण्यासाठी शिक्षक अनवाणी पायी 170 किलोमीटरचे अंतर पार करणार आहेत.

या आत्मक्लेश यात्रेत राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.