Lonavala : पोलीस वसाहतीची मरणासन्न अवस्था ; घराकरिता पोलीस फिरतायेत वणवण

एमपीसी न्यूज- गळकी घरं… घराच्या कौलांवर वाढलेले गवत… दारं खिडक्यांची दैनावस्था… स्वच्छतागृहांची दुरवस्था… जनावरांच्या कोंडवाड्यासारख्या चाळी… गार्डनच्या जागेवर अपघातग्रस्त वाहनांचे झालेले अतिक्रमण ही अवस्था आहे पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरातील पोलीस वसाहतीची. अशा वातावरणात शहरातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेकरिता दिवसरात्र काम करणार्‍या पोलीसांचे कुटुंब मात्र जीव मुठीत धरुन जगत आहे. या भयावह वास्तवातून महाराष्ट्र शासनाचा गृहविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस कर्मचार्‍यांची सुटका करणार तरी केव्हा अशा संतप्त भावना आता पोलीस कुटुंबियांसह नागरिक व्यक्त करत आहेत.

लोणावळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत पोलीस विभागाची तब्बल तीन एकर जागा आहे. आजमितीला करोडो रुपयांची ही मालमत्ता केवळ देखभाल व दुरुस्ती अभावी धुळीला मिळाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1918 साली सदर पोलीस वसाहत बांधण्यात आली होती. याठिकाणी 28 घरे आहेत. मात्र एकही घर राहण्यायोग्य नसल्याने पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना जीव मुठीत धरुन नाईलाजास्तव येथे राहण्याची वेळ आली आहे.

वास्तविक पाहता लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण व कामशेत येथील सर्व पोलीस राहू शकतील एवढी मोठी ही जागा असताना देखील पोलिसांना जादा पैसे देऊन शहरात घर भाड्याने घेण्याकरिता वणवण फिरावे लागत आहे. वसाहतीमधील घरे कधी पडतील, कधी काय होईल याची शाश्वती नसल्याने पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय वसाहतीमध्ये राहण्यास तयार नाहीत. आर.आर.पाटील गृहमंत्री असताना ते या वसाहती शेजारी असलेल्या लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालय‍ाच्या उद्घाटनाकरिता आले असता, सदरची वसाहत दाखवत ती दुरुस्त करण्याची मागणी पोलिसांनी केली होती.

यानंतर किमान डझनभर वेळा महाराष्ट्र शासनाचा गृहविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पोलीस वसाहत दुरुस्ती व नुतनीकरणाकरिता पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र आजपर्यत कोणत्याही सरकारच्या काळात पोलीस वसाहतीच्या विषयाकडे गांभीर्याने पाहिले न गेल्याने आज ही वसाहत मोडकळीला आली आहे. घरामध्ये पावसाचे पाणी गळू नये याकरिता कौलांवर प्लास्टिक कागद बांधण्यात आला आहे. तरी देखिल पाणी गळत असल्याने घरात सर्वत्र भांडी ठेवावी लागतात.

नागरिकांना घराच्या व सोसायट्यांच्या सुरक्षेकरिता सीसीटिव्ही कॅमरे बसवा, सोसायट्यांना गेट बसवा, वाॅचमन ठेवा असे सल्ले पोलीस विभाग देतो, मात्र येथे पोलीस वसाहतीला ना सीसीटिव्ही कॅमेरा आहे ना वाॅचमन ना वसाहतीच्या प्रवेशद्वाराला गेट आहे. वसाहतीमध्ये असलेल्या गार्डनच्या जागेवर पूर्वी मुलांना खेळण्याकरिता खेळणी, झोके तसेच व्यायामाकरिता बार लावलेले होते. आता मात्र सदरच्या गार्डनमध्ये अपघातग्रस्त वाहनांचे अतिक्रमण झाले आहे. वसाहतीचा परिसर झाडांचा पालापाचोळा व कचर्‍याने भरलेला असून गटारे तुंबली आहेत. उंदरांनी गटारामध्ये मोठेमोठे उकिर काढले आहेत, स्वच्छतागृहाची अवस्था बिकट आहे.

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणार्‍या पोलिसांच्या घरांची झालेली ही वाताहत तळपायाची आग मस्तकाला भिडवणारी आहे. पोलिसांची कोणतीही संघटना अथवा युनियन नसल्याने त्यांना त्यांच्या हक्काकरिता आंदोलन करता येत नाही हे खरे असले तरी वरिष्ठ कार्यालयाने किमान आपल्या कर्मचार्‍यांना चांगली घरे देण्याची तसदी घ्यावी अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करत आहेत. झोपडीवजा घरांमध्ये राहून पोलिसांची मानसिकता व कार्यक्षमता खालवत चालली आहे.

ब्रिटिशकालीन सदरची इमारत पाडून त्याठिकाणी चांगल्या प्रतीची वसाहत बांधल्यास पोलिसांची घरांकरिता सुरु असलेली वणवण थांबेल तसेच पोलीस ठाण्याच्या शेजारीच राहण्याची व्यवस्था झाल्यास पोलिसांना कामाच्या ठिकाणी तसेच कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येऊ शकेल याच शंका नाही. लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील सर्वच पोलीस वसाहतींची अशीच अवस्था असल्याने महाराष्ट्र शासनाचा गृहविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने पोलीस वसाहतीचा प्रश्न सोडविण्याकरिता हालचाली कराव्यात अशी मागणी पोलीस कुटुंबीय व नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.