Nigdi : दोन खुनाच्या गुन्ह्यात सात वर्षांपासून फरार आरोपीला पिस्तुलासह अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – चाकण परिसरात कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

संतोष मधुकर मांजरे (वय 29, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन खुनाच्या गुन्ह्यात मागील सात वर्षांपासून फरार असलेला आरोपी निगडी येथील ओटास्किम येथे येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार आणि कर्मचारी शिवानंद स्वामी यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी ओटास्किम परिसरात सापळा लावला. आरोपी संतोष ओटास्किम येथे एका रिक्षातून आला. तो कोणाचीतरी वाट पाहत थांबला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संतोष आणि त्याचा साथीदार मंगेश गाडे या दोघांनी मिळून मार्च 2013 मध्ये दत्तात्रय नामदेव घनवट (रा. कोरेगाव खुर्द) यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला होता.

त्यानंतर लगेच एका महिन्यानंतर एप्रिल 2013 मध्ये संतोष, त्याचे साथीदार कैलास जावळे, सागर जावळे यांनी राजकीय वादातून धनंजय वसंत आवटे (रा. कुरकुंडी) यांच्यावर कोयत्याने वार करत तसेच गोळी झाडून निघृणपणे खून केला होता. वरील दोन्ही गुन्ह्यांमध्ये संतोष मागील सात वर्षांपासून फरार होता. त्याने चाकण आणि म्हाळुंगे परिसरात दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, सहाय्यक फौजदार दिलीप चौधरी, संपत निकम, संजय पंधरे, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, उषा दळे, विपुल जाधव, आतिष कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, नामदेव राऊत, नामदेव कापसे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.