Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरोराज पाणीपुरवठा करा – युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सातत्याने हात धुवाण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानुसार नागरिक सातत्याने हात धूत आहे. पंरतु, पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस दररोज पाणीपुरवठा करावा, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल यांनी केली.

याबाबत जयस्वाल यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात जयस्वाल यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये एकदिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रित ठेवण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. नागरिक त्याला प्रतिसाद देऊन आपल्या कुटुंबियांसोबत घरांमध्ये आहेत.

कोरोनामुळे सतत हात, घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अर्थातच पाण्याचा वापर वाढला आहे. त्यासाठी घरात उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरेसा नाही अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. उन्हाळा वाढत असल्याने अधिक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुढील 15 दिवस कोरोना विषाणूचा रोखण्याचे आव्हान सर्वांसमोरच आहे. त्यामुळे या कालावधीत दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जयस्वाल यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.