Dehugaon: देहूगावात उद्यापासून 14 दिवस लॉकडाऊन

Dehugaon: 14 days lockdown in Dehugaon from tomorrow देहूगावमध्ये 13 जूनपासून आजपर्यंत 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 13 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. त्यापैकी 12 जण पूर्णपणे कोरोना मुक्त झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देहूगाव येथे दि. 8 ते 21 जुलै असा 14 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.

देहू ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पुनम काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या सभेस पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता काळोखे, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, उपसरपंच स्वप्नील काळोखे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक संतोष येडे, पोलीस पाटील सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

देहूगावमध्ये 13 जूनपासून आजपर्यंत 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 13 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. त्यापैकी 12 जण पूर्णपणे कोरोना मुक्त झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

एका रुग्णाचा पत्ता सापडत नाही किंवा चुकीची माहिती दिलेली आहे. आज अखेर 23 जणांना क्वारंटाईन केलेले असून 13 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 10 जण होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली आहे.

गावातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जनता कर्फ्यूची मागणी सुरु केली होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर दबावही वाढत होता. कोरोनाला अटकाव करण्यासाठी काय करावे यासाठी उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने सभा घेऊन परिस्थितीचा आढावा घेत 14 दिवस गावबंदचा निर्णय घेण्यात आला.

या सभेत वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांनी ही साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांचा लॉकडाऊन करावा असे सुचविले. नियमानुसार एकाच घरातील 3 रुग्ण आढळल्यास त्या घरापासून तीन किलोमीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला जातो.

त्यानुसार आणखी काही निर्णय घेण्यात आले. याकाळात भाजी विक्री पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.  औषधाची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 व सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत सुरू ठेवावीत. दूध विक्री सकाळी 6 ते 10 या वेळेतच केली जाणार आहे.

भाजीपाल्यासह बेकरी, हार्डवेअर, स्टेशनरी ही दुकाने देखील पूर्णपणे बंद ठेवावीत. गावात फिरताना मास्क न वापरणाऱ्यांवर, विनाकारण भटकणाऱ्यावर व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, मॉर्निंग वॉक बंद करावे, 10 पेक्षा कमी व 60 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी व फुफ्फुसाचे आजारांसारख्या गंभीर आजारी व्यक्तींनी घराबाहेर पडू नये.

प्रत्येक सोसायटीमध्ये ऑक्सिजन मापक व थर्मल गन घ्यावी व प्रत्येकाची तपासणी करावी. बाहेरगावाहून आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करावी, आदी निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी दोन दिवस ध्वनीक्षेपकांवरून लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.

याशिवाय गावच्या सीमा बंदीचा निर्णय प्रांताधिकारी यांच्या परवानगीने करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. बाहेरगावी नोकरीसाठी जात असलेल्या व्यक्तींनी आपले हमीपत्र ग्रामपंचायतीकडे जमा करावे, असे अवाहनही ग्रामपंचायचीच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.