Talegaon News : WHO चे सभासदत्व देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची 14 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO – World Health Organization) सभासदत्व व चांगले पद देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका डॉक्टरने तळेगाव दाभाडे (Talegaon News) येथील एका डॉक्टरांची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Maharashtra News : राज्य शासनाचे नवे वाळू धोरण

या प्रकरणी तळेगाव दाभाडे (Talegaon News) येथील नामवंत डॉक्टर रोहित अगरवाल यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांकडे नुकतीच लेखी तक्रार केली आहे. डॉ. अगरवाल हे एमडी फिजिशियन आहे. फसवणूक करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. डॉ. चंद्रमणी हरिश्चंद्र दिडगावकर यांच्यावर त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा डॉ. दिडगावकर हेल्थ क्लिनिक या नावाने पुण्यात वाघोली येथे दवाखाना आहे.

पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, आपली डॉ. चंद्रमणी दिडगावकर यांच्याशी ओळख रशियातील वैद्यकीय महाविद्यालयात झाली. 2006 पासून ते आपल्या संपर्कात होते. त्यांनी आपल्याला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) सभासदत्व तसेच चांगले पद देतो, असे वारंवार सांगितले. त्याचा तुम्हाला वैद्यकीय व्यवसायासाठी खूप उपयोग होईल, असे आमिष दाखविले.

आपल्याला महाराष्ट्रामध्ये माझ्या राहत्या घरीच प्रॅक्टीस करायची आहे. मला कुठल्याही प्रकारे WHO चे सभासदत्व किंवा कोणतेही पद नको, असे दोन-तीन वेळा डॉ. दिडगावकर यांना आपण सांगितले. पण त्यांनी वारंवार मानसिक दबाव तंत्र वापरुन WHO चे सभासद तरी व्हा, अशी गळ घातली व सभासद होण्याकरिता किमान 20 ते 25 लाख रुपये खर्च करावा लागेल, असे सांगितल्याचे तक्रारअर्जात म्हटले आहे.

डॉ. दिडगावकर यांनी आपल्याकडून वेळोवेळी 14 लाख रुपये घेतले. त्यातील चार लाख रुपये महाराष्ट्र ग्रामीण बँक, लक्ष्मी को. बजार या नावावर ट्रान्सफर करुन घेतले व बाकीची रक्कम रोख रक्कम स्वरूपात वसूल केली. त्या नंतर आजतागायत त्यांनी कोणत्याही पध्दतीने WHO चे सभासद केले नाही व माझी आर्थिक फसवणूक केली, असा आरोप डॉ. आगरवाल यांनी तक्रार अर्जात केला आहे.

डॉ. दिडगावकर यांनी डॉ. अगरवाल यांना एचडीएफसी बँकेचे दोन धनादेश दिले. दोन्ही चेक बाऊन्स झाले, असे तक्रारअर्जात नमूद करण्यात आले आहे.

अशाप्रकारे डॉ. चंद्रमणी हरिचंद्र दिडगावकर, यांनी माझी गेल्या सहा वर्षांपासून फसवणुक केलेली आहे. डॉक्टर हे समाजामध्ये आदर्श म्हणून वावरत असतात. पण डॉ. चंद्रमणी हरिश्चंद्र दिडगावकर हे आमच्या डॉक्टरी पेशाला नाव ठेवण्याजोगे काम करीत आहे व डॉक्टरी पेशाचे नाव खराब करीत आहेत. डॉ. चंद्रमणी हरिश्चंद्र दिडगावकर, यांनी असे अनेक जणांकडून वारंवार पैसे उकळलेले आहेत. व सध्या डॉ. दिडगावकर हे वाघोली, पुणे येथे डॉ. दिडगावकर हेल्थ क्लिनिक या नावाने क्लिनिक चालवत आहे व सर्वसामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी डॉ. अगरवाल यांनी केली आहे.

याबाबत डॉ. चंद्रमणी दिडगावकर यांच्याशी संपर्क केला असता आपण व्यस्त असून नंतर याप्रकरणी बोलतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांची प्रतिक्रिया मिळताच बातमीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.