Pune : खडकवासला धरणात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आई-वडिलांबरोबर फिरायला आलेल्या मुलाचा पाय घसरून खडकवासला धरणात बुडून दूर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह काल (दि.30) सकाळी सापडला. ही घटना बुधवारी (दि. 29) सायंकाळी 5 वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ जितेंद्र बात्रा (वय 14, रा. रिंगास, जयपूर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आई-वडिलांसह रक्षाबंधनानिमित्त पुण्यातील विश्रांतवाडी येथील त्याच्या आत्याकडे आला होता. जितेंद्र बात्रा यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तो आई-वडिलांसमवेत खडकवासला धरणावर सकाळी फिरायला आला होता. दुपारी चारच्या सुमारास डीआयएटीजवळच्या खडकवासला धरणाच्या तीरावरून फिरत असताना पाय घसरून तो पाण्यात पडला.

तेथे पाणी खोल असल्याने तो बुडाला. नातेवाईक व इतर पर्यटकांनी आरडाओरडा केला. खडकवासला गावचे पोलीस पाटील ऋषिकेश मते आणि हवेली पोलीस ठाण्याचे जवान एम. ए. बाबर यांनी पोहून तीरालगतच्या परिसरात शोध घेतला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांसह सायंकाळी त्याचा शोध घेतला; परंतु खोल पाणी, दलदल आणि अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. अखेर काल सकाळी पार्थचा मृतदेह सापडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.