Dehuroad : विक्रीसाठी आणलेले सात पिस्टल गुन्हे शाखेकडून जप्त; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – विक्री करण्यासाठी देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. तिघांकडून सात पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा तीन लाख 57 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रावेत आणि सोमाटणे फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.

मनोज विष्णू जगताप (वय 20, रा. हडपसर), जॉन काशीनो परेरा (वय 31, रा. अहमदनगर), दीपक लिंबाजी सरोदे (वय 31, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत परिसरात गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर, दयानंद खेडकर, धनंजय भोसले यांना माहिती मिळाली की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत येथे दोघेजण संशयितरित्या थांबले असून त्यांच्याजवळ पिस्टल आहे. तसेच संशयितरित्या थांबलेले दोघेजण पिस्टल विक्रीसाठी आलेले आहेत. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार करून परिसरात सापळा लावला. आरोपींना पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.

दोघांकडे चौकशी केली असता आरोपी मनोज याच्याकडे एक पिस्टल आणि काडतुसे मिळाली. तर आरोपी जॉन याच्याकडे दोन पिस्टल आणि जिवंत काडतुसे मिळाली. सर्व मुद्देमाल जप्त करत दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी हे पिस्टल विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना त्यांच्याकडे तपास केला असता आरोपी मनोज याने त्याच्या घरी लपवून ठेवलेले तीन देशी बनावटीचे पिस्टल काढून दिले.

दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर, दयानंद खेडकर, धनंजय भोसले यांना माहिती मिळाली की, सोमाटणे फाटा येथे एक व्यक्ती पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमाटणे फाटा येथे दोन पथके तयार करून सापळा लावून आरोपी दीपक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण सात देशी बनावटीचे पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा तीन लाख 57 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर, मयुर वाडकर, दत्तात्रय बनसुडे, दयानंद खेडकर, फारूक मुल्ला, संदीप ठाकरे, धनराज किरनाळे, गणेश मालुसरे, सावन राठोड, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, नितीन बहिरट, राजकुमार ईघारे, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.