लोणावळा : निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान

146 houses damaged due to cyclone Nisarg in Pimpaloli village, Lonavala.(रामनगर 15 तर हनुमान टेकडी 13 घरे उडाली)

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळाने विसापुर किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या पिंपळोली गावातील 146 घरांचे निसर्ग वादळात नुकसान झाले आहे. तर लोणावळा शहरातील रामनगर येथील पंधरा व हनुमान टेकडी येथील तेरा घरांचे नुकसान झाले आहे.

बुधवारी मावळ परिसरात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने लोणावळा परिसर‍ासह रामनगर, हनुमान टेकडी येथील घरांसह पाथरगाव जवळील पिंपळोली गावाचे फार मोठे नुकसान झाले आहे.

गावातील 70 हून अधिक घरांचे पत्रे फुटले आहेत, दहा ते पंधरा घरांच्या भिंती पडल्या, जनावरांच्या जवळपास वीस गोठ्यांचे शेड उडाले, जिल्हा परिषद शाळेला या वादळाचा फटका बसला. सोबतच वार्‍याने महावितरणाचे 20 खांब पडले, दोन ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्याने पाच दिवस संपूर्ण गाव अंधारात आहे.

पुढिल किमान दहा दिवस गावात विज येण्याची शक्यता धुसर असल्याने या गावातील ग्रामस्तांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

निसर्ग वादळाचा फटका डोंगरभागातील गावांना जास्त बसला. कागदांप्रमाणे घरांचे पत्रे व साहित्य काहीकाळ या वादळात हवेत उडत होते. वार्‍यांच्या वेगाने पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी घरात साचले, पावसाकरिता घरात धान्याचा केलेला साठा यामध्ये भिजून गेला, घरातील सामान, कपडे व इतर वस्तूंची मोडतोड झाली.

जनावरांच्या अंगावर पत्रे पडल्याने ती देखिल जखमी झाली, दुग्ध व्यवसायांना फटका बसला. डोक्यावर छतच नसल्याने नागरिकांनी स्वतःचे जीव वाचवित गावातील शाळा, मंदिरे याचा आधार घेतला.

पिंपळोली गावाच्या माजी सरंपच रेश्मा बोंबले, रामचंद्र पिंपळे, नंदा चौरे, पोलिस पाटील दिपाली बोंबले व ग्रामस्थ यांनी रस्त्यावर पडलेले मोठे वृक्ष बाजूला करुन गावाचा रस्ता मोकळा करून घेतला, कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तलाठी कांबळे, ग्रामसेविका नूतन अमोलिक यांनी गावाचा पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी काल या गावाला भेट देत गावाची पाहणी केली. त्यांच्या सोबत पुणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, अंकुश देशमुख हे देखील होते. शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन बारणे यांनी ग्रामस्तांना दिले.

विजेची समस्या लवकरात लवकर सुटावी

पिंपळोली गावात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब पडले व ट्रान्सफार्मर खराब झाल्याने येथील विज पुरवठा खंडित झाला आहे. विज नसल्याने गावात घरांच्या दुरुस्तीचे कामे करता येत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

पावसाचे दिवस सुरु झ‍ाल्याने पाऊस कधी येईल याचा नियम नाही. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी घरांवर पत्रे पडण्याकरिता गावात विज पुरवठा सुरु होणे फार गरजेचे असल्याने विज वितरण कंपनीने तातडीने या गावातील विजेची समस्या सोडवावी अशी मागणी पिंपळोली ग्रामस्तांनी केली आहे.

दरम्यान विज वितरणाच्या अधिकार्‍य‍ांनी गावाला भेट देत विज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.