पुणे महापौरपदाची निवडणूक 15 मार्चला होणार

एमपीसी न्यूज – पुणे महापौरपदाची निवडणूक 15 मार्चला होणार असून त्याबाबतचे आदेश विभागीय आयुक्तांनी गुरुवारी महापालिकेला पाठविले आहे. 15 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख शुक्रवारी ठरवून ती जाहीर करण्यात येणार असल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवड येथील महापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापौरांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधीही होणार आहे. ही प्रक्रिया याच दिवशी पार पाडली जाणार आहे. त्यानंतर अन्य समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता सभागृहातील पदाच्याबाबत तारखा जाहीर झाल्याने कोणाकोणाला संधी दिले जाते. याकडे भाजपमधील नगरसेवकांचे लक्ष लागले राहिले.


भाजपकडून कोणाला महापौरपदाची संधी मिळणार ?

यंदाच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 162 जागांपैकी 98 जागी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस 40, काँग्रेस 11, शिवसेना 10, मनसे 2 आणि एमआयएम 1 जागा जिंकली आहे. या सर्व आकडेवारीवरून भाजपचा महापौर होणार हे निश्चित असून विशेष सर्व साधारण महिला गटासाठी यंदा महापौरपद आरक्षित आहे. तसेच या पदासाठी अनेक महिलांची इच्छुक म्हणून नावे पुढे येत आहे. त्यामध्ये मुक्ता टिळक, माधुरी सहस्त्रबुद्धे आणि वर्षा तापकीर यांची नावे सध्या चर्चेत आहे. भाजपकडून कोणाला संधी दिली जाते. हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.