Maharashtra News : राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात

एमपीसी न्यूज – राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी रात्री आठ पासून 1 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्यात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. या कालावधीत घालण्यात आलेले निर्बंध काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना, वाहतूक, संचार अशा सर्व गोष्टींवर निर्बंध आहेत. मात्र आपत्कालीन स्थितीत नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. त्यांना पासची गरज लागणार नाही, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले आहे. मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान प्रवासासाठी पोलिसांच्या पासची आवश्यकता होती.

संचारबंदीस सुरुवात होताच चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची पोलीस विचारपूस करीत आहेत. तसेच विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास नागरिकांवर कारवाई देखील केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.